शेतकऱ्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा  - police action shetkari samp | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जून 2017

दुपारी महामार्गावरून गोकुळ व चितळे डेअरीचे दूध टॅंकर पोलिस बंदोबस्तात कोल्हापूरकडे नेण्यात आले. खटाव तालुक्‍यातील रणसिंगवाडीत शेतकऱ्यांनी दूध फेकुन देण्याऐवजी ते गरजू व गरिबांना वाटले. 

सातारा : संपूर्ण कर्जमाफी मिळावी, तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला साताऱ्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पोलिस शेतकरी संघटनांच्या माघावर असल्याने छुप्या पध्दतीने आंदोलने झाली. 

सकाळपासूनच महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोडावली होती. सातारा शहरात काही दुकाने सुरू होती. पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने शहरातून मोर्चा काढून संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पोवईनाका येथे घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. वाढे फाटा येथे महामार्गावर राष्ट्रवादी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूधाच्या टॅंकरवर दगडफेक केली. 

कोरेगाव, दहिवडी येथे आठवडा बाजार बंद ठेवून शेतकरी संपात सहभागी झाले. कऱ्हाड शहरात दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रॅलीस सुरवात झाली. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून रॅली चावडी चौकमार्गे कृष्णानाका, प्रांत कार्यालयापर्यंत आली येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. रॅलीत सहभागी शेतकरी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत होते. 

पाचवड (ता. वाई) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्यावतीने आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग रोको आंदोलन झाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी व पणन राज्यमंत्री तसेच सह पालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्याला उसाच्या दांडक्‍याने बडविण्यात आले. यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख