pol family role in man politics | Sarkarnama

पोळतात्यांच्या सुनांच्या नशिबी संघर्षच ! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जून 2017

माण मतदारसंघात पोळतात्यांना मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याची झलक जिल्हा परिषदेला पहायला मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकतही ही ताकद निर्णायक असणार आहे. सभापतीपदासाठी डावलणाऱ्यांना विधानसभेला डावलण्याची भूमिका पोळ समर्थक नक्‍की घेऊ शकतात ! 

सातारा : माण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात दिवंगत नेते सदाशिवराव पोळ (तात्या) हे चाळीस वर्षे "किंगमेकर' होते. मतदारसंघ आरक्षित असल्याने ते ज्याला उमेदवारी देतील तो अनुसूचित जातीतील उमेदवार आमदार व्हायचा. 2009 ला मतदारसंघ खुला झाला ; तात्या उभे राहिले, मात्र राष्ट्रवादीतीलच विरोधकांनी त्यांचा पराभव घडवून आणला. पोळतात्या किंगमेकर राहिलेतरी दुष्काळी भागाचा नेता म्हणून त्यांच्या वाट्याला उपेक्षा, अवहेलना आली. आज तोच अनुभव त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या दोन्ही सुना घेत आहेत. 

सदाशिवतात्यांचा प्रभाव असताना आमदारपद आरक्षित होते, त्यामुळे त्यांना आमदार होता येत नव्हते. यादरम्यान, ते पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर सातत्याने निवडून जात होते. ते तालुक्‍यात अनेकवर्षे सभापती राहिले, मात्र त्यांना एकदाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ दिले गेले नाही. यादरम्यानच्या राजकारणात त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अढळ निष्ठा ठेवली होती. त्यामुळे 2002 मध्ये पवारांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. 2004 च्या निवडणुकीतही तात्यांचा करिश्‍मा कायम राहिला. त्यांनी दिलेला उमेदवार आमदारकीला मोठ्या फरकाने विजयी झाला. 

पुढच्या काळात राजकारण वेगाने बददले. पैसा आणि दादागिरीचे राजकारण तालुक्‍यात घुसले आणि तात्या मागे पडत गेले. विरोधक लोकांना विकत घेत असताना पक्षातील काही असंतुष्ट मंडळी तात्यांना त्रास देत होती. त्याचा फटका 2009 च्या विधानसभा निवडणुकीत बसला. तात्या अल्पमतांनी पराभूत झाले. राष्ट्रवादीच्याच लोकांनी त्यांचा पराभव केला. पुढे पक्षांतर्गत संघर्ष वाढत गेला. तात्यांना अपयश येत गेले. 

सुमारे दोन वर्षापुर्वी तात्यांचे निधन झाले. त्यानंतर पोळ कुटूंब राजकारण करणार कां, असे प्रश्‍न उपस्थित झाले. याचे उत्तर चार पाच महिन्यांपुर्ची झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मिळाले. त्यांच्या दोन्ही सुना डॉ. भारती आणि सोनाली या जिल्हा परिषदेला निवडून आल्या. तात्यांप्रती असलेले कृतज्ञतेचे दान जनतेने त्यांच्या पदरात टाकले. तालुक्‍यात राष्ट्रवादी जिंकली. तात्यांच्या सुना अर्थात त्या एकमेंकीच्या जावा; त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे कौतुक झाले. माणमधील निराश राष्ट्रवादीला आशेचा किरण दिसू लागला. त्यामळे जिल्हा पातळीवर सत्ताधारी असलेली राष्ट्रवादी पोळतात्यांच्या कुटूंबाला बळ देणार, कुटूंबात जिल्हा परिषदेचे एक सभापतीपद मिळणार, अशा बातम्या येत होत्या. यासंदर्भाने पक्षप्रमुख शरद पवार यांनी सूचना केल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष निवडीत पोळ कुटूंबात कोणतेच पद मिळाले नाही. 

पोळ तात्यांच्या कुटूंबाला डावलण्याचा प्रकार हा माण तालुक्‍यासाठी धक्‍काच होता. सभापतीपद ही औपचारिकता होती. मात्र प्रत्यक्षात पोळ विरोधाचे राजकारण झाले. पक्षांतर्गत नव्या कारभाऱ्यांनी पोळांची शिफारस करणे आवश्‍यक होती. माणचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी पोळ यांच्याऐवजी दुसऱ्या सदस्याच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे पोळ समर्थकांचा हिरमोड झाला. मात्र या प्रकारामुळे निराश न तात्यांच्या दोन्ही सुनांनी आपले काम दुप्पट वेगाने वाढवले आहे. स्वत: च्या कार्यक्षमतेवर "एकला चलो'चा नारा देत मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकांच्या अडीअडचणींकडे त्या स्वत: लक्ष देत आहेत. तालुक्‍यात राष्ट्रवादीचे नेतृत्व पोळ गटाला बरोबर घेवो अथवा न घेवो आपले काम आपण करायचे हा निर्धार त्यांनी केलेला आहे. त्याच्या भूमिकेला तालुक्‍यातून प्रतिसाद मिळत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख