जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव बंधू डॉ. भारतभूषण यांनीच केला - रमेश पोकळे

शिवसेनेकडून विधान परिषद मागता यावी यासाठी पराभवाचे खापर भाजपवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनाच जयदत्त क्षीरसागर निवडून यावे असे वाटत होते का, अशी शंका आहे अशी प्रतिक्रीया भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केला.
 जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव बंधू डॉ. भारतभूषण यांनीच केला - रमेश पोकळे

बीड : विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर विजयी व्हावेत यासाठी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मोठे प्रयत्न केले. यावेळी त्यांनी आपण वा भाजपच्या एकही जबाबदार पदाधिकाऱ्यांना फोन केला नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर निवडून यावेत असे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना वाटत होते का, अशी शंका आहे. त्यांनी शहरभर केलेल्या खड्ड्यांमुळेच जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केला. 

दोन दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवाच्या चिंतन बैठकीत पराभवाचे खापर भाजपवर फोडण्यात आले. त्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. भाजप नेते राजेंद्र मस्के, जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर, तालुकाध्यक्ष चंद्रकांत फड, प्रा. देविदास नागरगाजे उपस्थित होते. भाजपमुळेच पराभव झाल्याचे खोडसाळ मत काहींनी व्यक्त केले तर काहींना जाणीवपूर्वक बोलायला लावले. क्षीरसागरांच्या घरातच समन्वयाचा अभाव होता. जयदत्त क्षीरसागर यांचे काम करा, असा एकही फोन डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आपणाला किंवा भाजपच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना केला नाही असेही रमेश पोकळे म्हणाले. 

पंकजा मुंडे यांच्या आदेशाने आम्ही जीव तोडून प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, शहरभर सर्वत्र खड्डे पडलेले होते. अगदी त्यांच्या महाविद्यालयासमोरील खड्ड्यांतूनही वावरता येत नव्हते. यापूर्वीच्या निवडणुकांत रात्रीतून रस्ते केले जात, तशी तगडी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. यावेळी खड्डे का बुजले नाहीत. जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव व्हावा म्हणूनच हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोपही श्री. पोकळे यांनी केला. जयदत्त क्षीरसागर यांनीही भाषणात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे मतदानात खड्डे पडल्याचा उल्लेख केला. परंतु, त्यांना बंधू भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर थेट बोलता आले नाही. त्यांना क्‍लिन चिट दिल्याचे सांगत हा सर्व विधान परिषद मागण्यासाठी खटाटोप असल्याचेही रमेश पोकळे म्हणाले. क्षीरसागरांचे होमपिच नवगण राजूरी व बालेकिल्ला अशी ओळख असलेले बीडमध्येही त्यांना भरघोस मते मिळवता आली नाहीत त्यामुळे त्यांनी भाजपवर खापर फोडू नये असेही रमेश पोकळे यावेळी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com