पुण्यात महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांना धमकी 

पुण्यात महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांना धमकी 

पुणे : अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून फेरीवाल्यांनी पुणे महापालिकेच्या उपायुक्तांनाच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) कार्यकर्ता सूरज गायकवाड याचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

मोहम्मद हुसेन इस्माईल शेख व महेंद्र अशोक रसाळ या दोघांसह एका ज्येष्ठ नागरिकास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप हे महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निमुर्लन विभागाचे उपायुक्त म्हणून काम पाहतात. जगताप यांच्या आदेशानुसार बुधवारी हडपसर येथील सासवड रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी गुरुवारी जगताप यांच्या कार्यालयात येऊन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फेरीवाल्यांनी आरडाओरडा करून जगताप यांना कार्यालयाबाहेर जाण्यापासून रोखले. तसेच त्यांना बघून घेऊ, अशा शब्दात धमकी दिली.

त्यामुळे जगताप यांनी त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यावरून तिघांना अटक करण्यात आली. यापुर्वी येरवडा येथे अतिक्रमण कारवाईच्यावेळीही जगताप यांना काही फेरीवाल्यांकडून मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. बुुधवारी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता विश्वनाथ बोटे हे फुरसुंगी येथे अतिक्रमण कारवाई करत होते. त्यावेळी तिघांनी त्यांना कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी त्यांची कार आडवी लावली. तसेच फिर्यादी व अन्य कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. त्याप्रकरणी बोटे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सूरज गायकवाड यास पोलिसांनी अटक करून त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com