PM in Nagpur | Sarkarnama

पंतप्रधानांनी केले दीक्षाभूमीवर ध्यान 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरातील दीक्षाभूमीवर येऊन या पवित्र ठिकाणी जवळपास पाच मिनिटे ध्यान केले. 

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरातील दीक्षाभूमीवर येऊन या पवित्र ठिकाणी जवळपास पाच मिनिटे ध्यान केले. 

पंतप्रधान मोदी यांचे आज सकाळी दीक्षाभूमीवर आगमन झाले. तेथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतल्यानंतर परिसराची पाहणी केली. भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विश्‍वस्तांशी बोलताना दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्‍वासन दिले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षाभूमीच्या विकासासाठी 350 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाची माहिती पंतप्रधानांना दिली. 
दीक्षाभूमीहून निघताना पंतप्रधानांनी माझ्यामुळे दीक्षाभूमीवर येणाऱ्यांची गैरसोय तर झाली नाही ना, अशी विचारणा विश्‍वस्तांकडे केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई व सरचिटणीस सदानंद फुलझेले यांनी पंतप्रधान मोदी यांना दीक्षाभूमी स्मारकाची प्रतिकृती असलेली स्मृतीचिन्ह भेट दिले. यावेळी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी मुख्यप्रवेश द्वाराजवळ पुष्पगुच्छाने स्वागत केले. 
पंतप्रधानांचा दौरा होईपर्यंत दीक्षाभूमीवर आज कुणालाही जाऊ दिले नाही. या परिसरात दुकाने लागली नव्हती. जवळपास 2 तास हा परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पंतप्रधान दीक्षाभूमी परिसरातून निघाल्यानंतरच दीक्षाभूमी अनुयायांसाठी खुले करण्यात आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख