Pm modi praises bjp workers | Sarkarnama

भाजप कार्यकर्ता तो देश के लाल हे! उनके दलाल है : पंतप्रधान मोदी 

उमेश घोंगडे
रविवार, 20 जानेवारी 2019

माढा, सातारा, हातकणंगलेसह दक्षिण गोवा या लोकसभा मतदारसंघांतील भाजप बूथ कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सरकारची कामे लोकांपर्यंत कशी पोचवावीत, या विषयी ते सविस्तर बोलले.

पुणे : देशसेवा आणि देशहिताला प्रथम प्राधान्य हीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची खरी ओळख आहे. देशात आलेल्या आधीच्या सरकारांमुळे कार्यकर्त्याची ओळख दलाल अशी झाली आहे. मात्र, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतमातेचे खरे लाल आहेत. त्याग, समर्पण, मेहनत, समाजसेवा, देशभक्ती आणि विपरित परिस्थितीशी सामना करण्याची हिम्मत हीच भाजपाच्या कार्यकर्त्यांची खरी ओळख आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले. 

कोल्हापूर, हातकणंगले, माढा, सातारा व दक्षिण गोवा या लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुखांशी पंतप्रधान मोदी यांनी आज "व्हीडीओ कॉन्फरन्स'च्या माध्यमातून संवाद साधला.पंतप्रधान मोदी यांनी या सर्व मतदारसंघातील बूथप्रमुखांशी स्वतंत्रपणे संवाद साधला.

ते म्हणाले, "" विरोधकांनी एकत्र येऊन छोट्या-मोठ्या पक्षांचे मिळून दलोंका गठबंधन बनवले आहे. आपण साऱ्यांनी एकत्र येऊन लोकांमधील `दिलोंके गठबंधन` बनवले आहे. आपआपल्या मुलाबाळांना राजकारणात सेट करण्यासाठी त्यांची युती आहे. भाजपात कुणाला सेट करण्यासाठी कुणी काम करीत नाही. भाजप कार्यकर्त्यांनी आपली खरी ओळख विसरू नये. पद हे एक रचनेचा भाग आहे. खरा कार्यकर्ता पदासाठी काम करत नाही.``

खुल्या गटातील आरक्षणाने विरोधकांची झोप उडाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आरोप होऊ लागले आहेत. केवळ 48 तासात आरक्षणाचा कायदा आम्ही केला. त्या धक्‍क्‍यातून अद्याप विरोधक बाहेर आलेले नाहीत. निवडणूक समोर ठेऊन यातील काहीच केलेले नाही. कायद्यात बदल करून हे करणे योग्य होते म्हणूनच संसदेत कायद्याला मंजुरी घेतली. खुल्या गटासाठी 10 टक्के आरक्षणाबरोबरच प्रत्येक अभ्यासक्रमात 10 टक्के जागा वाढविण्यात येतील. या आरक्षणामुळे इतर कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे मोदी यांनी स्पष्ट केले. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख