pm criticizes congress over the `adarsh' scam   | Sarkarnama

पंतप्रधानांचा कॉंग्रेसला `आदर्श'वरून टोला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मेट्रो आणि गृहनिर्माण योजनांच्या मुद्‌द्‌यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्ला केला. कॉंग्रेसच्या "मनमानी नेतृत्वा'मुळे "वादा' एक दिला जायचा आणि "डिलिव्हरी' वेगळीच व्हायची, असी खोचक टीका त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे नाव न घेता केली.

पुणे : मेट्रो आणि गृहनिर्माण योजनांच्या मुद्‌द्‌यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्ला केला. कॉंग्रेसच्या "मनमानी नेतृत्वा'मुळे "वादा' एक दिला जायचा आणि "डिलिव्हरी' वेगळीच व्हायची, असी खोचक टीका त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे नाव न घेता केली. 

सिडको महागृहनिर्माण योजनेअंतर्गत आदर्श सोसायटी निर्माण केली जाईल; मात्र ही सोसायटी कॉंग्रेसच्या काळात प्रसिद्धीस आलेल्या "आदर्श'सारखी नसेल, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गाचे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिसर(पूर्व)-मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गाचे भूमीपूजन केले. या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सिडको महागृहनिर्माण योजना 2018 चे भूमिपूजनही करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "रेरा' लागू केल्याबद्दल अभिनंदन केले. "रेरा' लागू करणारे महाराष्ट्राने पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

एनडीए सरकारचा कारभार आणि कामाची गती पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारपेक्षा वेगळी असल्याचे सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की मुंबईतील पहिली मेट्रो योजना आठ वर्षे रेंगाळली. ही योजना का रेंगाळली, हे सांगणे कठीण आहे. 2014 मध्ये 11 किलोमीटरची मेट्रो धावली. आमच्या सरकारने मेट्रोच्या कामाच्या गती वाढवली. आज दोन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन होत आहे. येणाऱ्या तीन वर्षांत 35 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम होईल, असे त्यांनी सांगितले. 2022 पर्यंत पावणेतीनशे किलोमीटर मेट्रोचे काम पूर्ण होईल. 

कॉंग्रेस सरकाने त्यांच्या चार वर्षांच्या काळात 25 लाख 50 हजार घरे बांधली. आम्ही मात्र एक कोटी 25 लाख घरे बांधल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख