प्लास्टिक दिसेल तिथे कारवाई : रामदास कदम

प्लास्टिक दिसेल तिथे कारवाई : रामदास कदम

मुंबई : ऑक्‍टोबरपासून प्लास्टिकबंदीची प्रखर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्लास्टिक दिसेल तिथे कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.

बंदी असलेले प्लास्टिक, प्लास्टिकच्या वस्तू वापरणाऱ्या नागरिकांसह प्लास्टिक पिशव्यांवर प्रक्रिया करण्यासाठी योजना न आखणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. 

गुढीपाडव्यापासून अर्थात, 18 मार्चपासून राज्यात प्लास्टिकबंदीचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर तीन महिन्यांनी 30 जूनपासून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली; मात्र यातून नागरिकांना वगळण्यात आले होते. बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्या नागरिकांवर कोणतीही कारवाई केली जात नव्हती. केवळ व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात होती. आता, ऑक्‍टोबरपासून थेट नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी दिले.

 त्यांनी प्लास्टिकबंदीचा आढावा घेण्यासाठी पर्यावरण विभागाची बैठक घेतली. या वेळी प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारने 27 जूनला पाव किलोहून अधिक वजनाच्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकच्या पिशव्या काही अटींवर वापरण्यास परवानगी दिली होती.

या पिशव्या वापरताना व्यापाऱ्यांना पुनर्प्रक्रियेसाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते; मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश आज कदम यांनी दिले.

असा होईल दंड 
पहिल्यांदा ः पाच हजार रुपये 
दुसऱ्यांदा ः दहा हजार रुपये 
तिसऱ्यांदा ः 25 हजार रुपये आणि न्यायालयीन कारवाई 

प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी वारंवार मुदतवाढ देणे शक्‍य नाही. सर्वांना योग्य संधी दिली आहे. मुदतवाढ देत राहिल्यास अंमलबजावणी करणे शक्‍य नाही. केवळ सात-आठ टक्के व्यापाऱ्यांनी प्लास्टिकवर प्रक्रिया करण्याचे नियम पाळले आहेत. प्लास्टिकचा फेरवापर उत्पादकांना सक्तीचे होते; मात्र प्रत्यक्षात प्लास्टिक कचऱ्यातच जात आहे. त्यामुळे कठोर भूमिका घेण्यात येत आहे.
- रामदास कदम, पर्यावरणमंत्री  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com