pimpri-youth-committed-suicide | Sarkarnama

मराठा तरुणांच्या आत्महत्येचे लोण पिंपरी-चिंचवडपर्यंत

उत्तम कुटे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पिंपरीः राज्यातील व त्यातही मराठवाड्यातील मराठा तरुणांच्या आत्महत्येचे लोण पिंपरी-चिंचवडपर्यंत आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनात सामील झालेल्या राजेश्वर दिनकर पाटील (वय ३०) या बेरोजगार पदवीधर तरुणाने नैराश्य आल्याने भोसरीत सार्वजनिक ठिकाणी गळफास घेऊन परवा (ता.8) आत्महत्या केली. 

पिंपरीः राज्यातील व त्यातही मराठवाड्यातील मराठा तरुणांच्या आत्महत्येचे लोण पिंपरी-चिंचवडपर्यंत आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनात सामील झालेल्या राजेश्वर दिनकर पाटील (वय ३०) या बेरोजगार पदवीधर तरुणाने नैराश्य आल्याने भोसरीत सार्वजनिक ठिकाणी गळफास घेऊन परवा (ता.8) आत्महत्या केली. 

मात्र, कालच्या सकल मराठा समाजासह इतर संघटनांच्या राज्य `बंद'मुळे मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या या तरुणाच्या आत्महत्येचा हा प्रकार दोन दिवसानंतर उघडकीस आला. `बंद'च्या बंदोबस्तामुळे पोलिसांनी मृत तरुणाच्या नातेवाईकांच्या शोध घेण्याऐवजी त्याचे नातेवाईकच पोलिस ठाण्यावर गेल्याने या घटनेचा आज उलगडा झाला.

दरम्यान, राजेश्वरचा मृतदेह परस्पर रुग्णालयात नेल्याने या घटनेतील पुरावा नष्ट झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असल्याचा संशयही त्यांनी वर्तविला. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी त्याचा चुलतभाऊ प्रमोद पाटील यांनी आज `सरकारनामा'शी बोलताना केली. तर, ही आत्महत्या नसून सरकारने घडवून आणलेली हत्या आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार म्हणाले.

राजेश्वर मूळचा लातूरचा. नोकरी नसल्याने वय होऊनही त्याचे लग्न झाले नव्हते. त्या नैराश्यातूनच त्याने जीव दिल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. 58 मोर्चे निघूनही सरकार काहीच करत नाही. आपल्याला नोकरीही मिळत नाही. यामुळे नैराश येऊन राजेश्वरने आत्महत्या केली, असा आरोप पवार यांनी `सरकारनामा'शी बोलताना केला. शिक्षण असून नोकरी नाही. आरक्षण नसल्याने संधी नाहीत. नोकरी नसल्यामुळे लग्न होत नाही. मराठा तरुणांना जगणं अवघड आणि मरण स्वस्त झाले आहे, असे ते म्हणाले.

पाटील कुटुंबाची गावाकडे ५ एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यात कुटुंब चालवणे शक्य नसल्यामुळे त्याचा मोठा भाऊ काही वर्षांपूर्वी भोसरी येथे आला होता. येथे एका खासगी कंपनीत तो कामाला आहे. राजेश्वर हा सुद्धा दोन महिन्यापूर्वी त्याच्याकडे आला होता. नोकरी शोधत तो मराठा आरक्षणाच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असायचा. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी तो सतत मित्रांशी चर्चा करायचा, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितंले. परवा रात्री उशीरापर्यंत तो बातम्या पाहत होता. नंतर बाहेर पडला. भर रस्त्यात त्याने जीव दिला. सकाळी हा प्रकार समजला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविला.

दरम्यान, राजेश्वर घरी न आल्याने त्याचा नातेवाईकांनी शोध सुरु केला. मात्र, तो मिळून आला नाही. अखेरीस आज त्याचा भाऊ भोसरी पोलिस ठाण्यावर गेला. राजेश्वरचा फोटो पोलिसांनी दाखवताच त्याचा भाऊ पोलिस ठाण्यातच कोसळला. राजेश्वरच्या मृत्यूची `अकस्मात मृत्यू' अशी नोंद भोसरी पोलिसांनी केली आहे. 

दरम्यान, कालच्या `बंद'च्या बंदोबस्तामुळे मृत राजेश्वरच्या नातेवाईकांचा शोध घेऊ शकलो नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख