pimpri-water-crisis | Sarkarnama

मागितले पुरेसे पाणी, मिळाले दंड़ुक्याचे फटके

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

अपुरे पाणी मिळत असल्याची तक्रार एका रहिवाशाने करताच पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी या रहिवाशालाच नव्हे, तर त्याच्या सर्व कुटुंबालाच बेदम मारहाण केली. मात्र मारहाण करणारे कार्यकर्ते आपले नसल्याचे सदर नगरसेवकाने सरकारनामाशी बोलताना आज सांगितले.

पिंपरीः पुण्याबरोबर पिंपरी-चिंचवडमध्येही पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण भरूनही तिथे कृत्रिम पाणीटंचाई सुरु आहे. पिंपरीतील पाणीप्रश्न,तर आता पोलिस ठाण्यावरच विजयादशमीच्या मुहूर्तावर गेला. अपुरे पाणी मिळत असल्याची तक्रार एका रहिवाशाने करताच पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी या रहिवाशालाच नव्हे, तर त्याच्या सर्व कुटुंबालाच बेदम मारहाण केली. मात्र मारहाण करणारे कार्यकर्ते आपले नसल्याचे सदर नगरसेवकाने सरकारनामाशी बोलताना आज सांगितले.

तुषार कामठे असे या नगरसेवकाचे नाव आहे. त्यांच्या नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याच पोलिस ठाण्यावर कामठे यांच्याविरुद्ध चिटींग अॅन्ड फोर्जरीचा गुन्हा गेल्यावर्षी दाखल झालेला आहे. पालिका निवडणुकीच्या वेळी कमी शिक्षण असतानाही ते अधिक असल्याचा बनावट शैक्षणिक दाखला बनवून तो सादर केल्याबद्दल कामठे यांच्याविरुद्ध त्यांचे पालिका निवडणुकीतील प्रतिस्पर्धी व शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचीन सांठे यांनी फिर्याद दिलेली आहे. 

कालच्या घटनेत संतोष दोडके (वय 43, रा. धीरज गोल्ड अपार्टमेट,पंचशीलनगर, पिंपळे निलख) हे फिर्यादी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोडके हे पुण्यात गौरव नाटेकर यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करतात. त्यांच्या इमारतीत कमी दाबाने पाणी आले म्हणून त्यांनी काल सकाळी आपले नगरसेवक कामठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तक्रार केली. त्यावरून रात्री कामठे यांचा ड्रायव्हर गणेश, अमोल कामठे, प्रतीक दळवी, विशाल कामठे व इतर पाचजण त्यांच्या इमारतीत आले. जेवणाच्या ताटावरून त्यांना उठविण्यात आले. नंतर पाण्यावरून तुम्ही वरचेवर का तक्रारी करता असे म्हणत पार्किंगमध्ये त्यांना हाताने व लाकडी दंडुक्याने मारहाण करण्यात आली. यावेळी मध्ये आलेल्या त्यांच्या मुलालाही (प्रणिकेत) दंडुक्याने मारण्यात आले. पत्नी सारिका हिला प्रतिकने हाताने मारहाण केली. आरोपींना तातडीने अटक केली नाही,तर पोलिस आयुक्तालयापुढे आत्मदहन करू, असा इशारा दोडके यांनी दिला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख