pimpri-swabhimani-shetkari-sanghtana-contests-two-seats-vidharbha | Sarkarnama

स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भातील दोन लोकसभेच्या जागा लढविणार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विदर्भातील लोकसभेच्या दोन जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बुलडाणा व वर्धा या दोन मतदारसंघाची चाचपणी पक्षातर्फे करण्यात येत आहे.

अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विदर्भातील लोकसभेच्या दोन जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बुलडाणा व वर्धा या दोन मतदारसंघाची चाचपणी पक्षातर्फे करण्यात येत आहे.

स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये ही घोषणा केली होती.
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीची तयारी जोमाने सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील बुलडाणा, वर्धा, हातकंणगले, कोल्हापूर, म्हाडा, सांगली या लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा-शिवसेनेसोबत महायुतीमध्ये सहभागी झाली होती. भाजपा-सेनेची सत्ता आल्यावर स्वाभिमानीला सदाभाऊ खोत यांच्या रूपाने विधान परिषदेची एक जागा व मंत्रिमंडळात स्थान तसेच रविकांत तुपकर यांना महामंडळ देऊन सत्तेत वाटाही मिळाला होता; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. 

तुपकरांनी महामंडळाचा राजीनामा दिला व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमधून बाहेर पडली. सदाभाऊ खोत यांनी मात्र सत्तेत कायम राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आक्रमक भूमिक घेतली. 

गेल्याच महिन्यात दूध आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघता आता स्वाभिमानी पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी चाचपणी करीत आहे. बुलडाण्यात स्वाभिमानीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना तर वर्धेत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. 

माजी खासदार मोहिते यांनी शिवसेना, काँग्रेस,शिवसंग्राम असा प्रवेश करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला असल्याने त्यांच्या वलयाचा पक्षाला फायदा होईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख