शिवसेनेच्या खासदारानंतर आता आमदाराकंडूनही  पिंपरी पालिकेची पंतप्रधान आवास योजना रडारवर

आगामी लोकसभा निवडणुकीत गतवेळसारखी युती होईल की नाही, याविषयी दोन्ही पक्ष सांशक आहेत. त्यामुळे ते या निवडणुकीत एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राहणार असल्याने त्यांच्यात आरोप, प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यातही संभाव्य उमेदवारांत त्यातून तू,तू,मैं,मैं होत आहे.
शिवसेनेच्या खासदारानंतर आता आमदाराकंडूनही  पिंपरी पालिकेची पंतप्रधान आवास योजना रडारवर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका राबवित असलेल्या पंतप्रधान आवास योजनेवर शिवसेना खासदारानंतर आता आमदारांनी सुद्धा शरसंधान केले आहे. या योजनेत दीडशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे पिंपरीचे आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार यांनी आता केला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आल्याने त्याची ही नांदी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत गतवेळसारखी युती होईल की नाही, याविषयी दोन्ही पक्ष सांशक आहेत. त्यामुळे ते या निवडणुकीत एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राहणार असल्याने त्यांच्यात आरोप, प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यातही संभाव्य उमेदवारांत त्यातून तू,तू,मैं,मैं होत आहे. नुकतेच शिवसेनेचे शहराचे दोन्ही खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील व श्रीरंग बारणे यांनी भाजपच्या आपल्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. पंतप्रधान आवास योजनेतील भ्रष्टाचारावरून न्यायालयात जाण्याचा इशाराही दोन्ही खासदारांनी दिला आहे.

त्याला लगेच भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार आणि बारणेंचे संभाव्य प्रतिस्पर्धी लक्ष्मण जगताप यांनी तसेच खणखणीत व उपरोधिक प्रत्यूत्तर दिले. खासदारांच्या या लढाईत शिवसेनेच्या आमदारांनीही आता उडी घेतली आहे. आमदार अॅड. चाबूकस्वार यांनी,तर एक पाऊल टाकले आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच याबाबत लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणाच्या निविदा रद्द करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

पिंपरी पालिकेच्या समाविष्ट गावातील साडेचारशे कोटी रुपयांच्या रस्ते कामात नव्वद कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार यापूर्वीच आढळराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यानंतर नुकतीच त्यांनी व बारणे यांनी स्वतंत्र पत्रकारपरिषद घेऊन पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला. या योजनेतील तिन्ही प्रकल्पांपैकी एकही चाबूकस्वार यांच्या मतदारसंघात नाही. त्यातील दोन हे भोसरीचे आमदार व भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे, तर एक हा जगताप यांच्या मतदारसंघात होत आहे.

शहरातील प्रत्येकाला 2002 पर्यंत घर देण्याचा केंद्राचा मनोदय आहे. त्यासाठी ही पंतप्रधान आवास योजना उद्योगनगरीतही राबविण्यात येत आहे. मात्र, शहरात चौदाशे ते पंधराशे रुपयांत प्रतिचौरस फूट चांगले बांधकाम होत असताना या योजनेत कंत्राटदाराला त्याच्या दुप्पट दर देण्यात आल्याने शिवसेनेला भाजपविरुद्ध आयतेच कोलीत मिळाले आहे. त्यामुळे गरिबांच्या नावाखाली स्वत:ची घरे भरण्याचा हा प्रकार असल्याचे शरसंधान चाबूकस्वार यांनी भाजपवर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com