Pimpri Political News GB Adjourned | Sarkarnama

नामुष्कीच्या शक्यतेमुळे भाजपवर पिंपरीत आमसभा स्थगितीची वेळ

उत्तम कुटे
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पिंपरीः  आरोग्यप्रमुखांना पदावनत करण्याच्या विषयावरून तिहेरी कोंडी झाल्याने आमसभा प्रथमच स्थगित करण्याची वेळ पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या सत्ताधारी भाजपवर काल (ता.20) आली. त्यासाठी कुठलेही संयुक्तिक कारण न देता दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजलीचे कारण पुढे करण्यात आले.

 

पिंपरीः  आरोग्यप्रमुखांना पदावनत करण्याच्या विषयावरून तिहेरी कोंडी झाल्याने आमसभा प्रथमच स्थगित करण्याची वेळ पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या सत्ताधारी भाजपवर काल (ता.20) आली. त्यासाठी कुठलेही संयुक्तिक कारण न देता दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजलीचे कारण पुढे करण्यात आले.

आमसभा स्थगित झाल्याने स्मार्ट सिटीसाठी सल्लागार नेमण्याचा ऐनवेळी प्रशासनाकडून येणारा विषयही  महिनाभर लांबणीवर पडल्याने अगोदरच विलंब झालेला हा प्रकल्प सुरु होण्यास पुन्हा खीळ बसली.तसेच थकबाकीदार करदात्यांना दंड सवलत देण्याचा विषयही लांबणीवर पडल्याने या सवलतीपासून त्यांना वंचित राहावे लागले आहे.

सव्वाचार वर्षापूर्वी महापालिकेतील यापूर्वीच्या सत्ताधारी राष्ट्रवादीने डॉ.अनिल रॉय यांना पालिकेचे आरोग्यप्रमुख तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून बढती दिली होती. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांना डावलून ती चुकीच्या पद्धतीने दिल्याचा साक्षात्कार आता पालिकेत सत्तेत प्रथमच आलेल्या भाजपला झाला. म्हणून विधी समितीने पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील डॉ. राय यांची निवड चुकीची ठरवून त्याजागी डॉ. साळवे यांची नियुक्ती करण्याचा ठराव 8 सप्टेंबर रोजी केला. तो काल आमसभेसमोर येणार होता. त्यावर वादळी चर्चा होण्याची दाट शक्यता होती. त्यात नामुष्की ओढवण्याची शक्यता असल्याने ही सभाच तहकूब करण्याची खेळी भाजपने खेळली.

डॉ.राय यांना पदावनत करण्यास राष्ट्रवादी व शिवसेनेकडूनही जोरदार विरोध आमसभेत होण्याची शक्यता होती. तसेच सत्ताधाऱ्यांचा एका प्रभावशाली गटाचाही डॉ. राय यांना पाठिंबा होता व आहे.त्यामुळे या विषयावर चर्चा होऊन मतदानाची वेळ आली असती,तर भाजपवर नामुष्की ओढवली असती. त्यामुळे विधी समितीने ठराव करूनही आमसभेला त्यावर काल मोहोर उमटवता आली नाही. त्यातून भाजपची वाटचालही अडचणीच्या वेळी सभा तहकूब करण्याच्या गत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मार्गावर सुरु झाल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे.

दरम्यान, भाजपच्या एका खासदारांच्या दबावातून आपल्याला पदावनत करण्याची खेळी करण्यात आल्याचा आरोप डॉ. राय यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. राजकीय दबावासह
आर्थिक देवाणघेवाण यासाठी झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे ती दाखल करून घेताना 25 सप्टेबरपर्यंत न्यायालयाने 'जैसे थे' चा आदेश दिला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दुहेरी नामुष्की झाली. तसेच आपल्याच एका गटाचा डॉ. राय यांना असलेल्या पाठिंब्यामुळे तिहेरी कोंडीत ते सापडले होते.

दुसरीकडे सेवेत असताना सत्ताधारी तसेच प्रशासनाच्या विरोधात  न्यायालयात धाव घेतल्याने डॉ. रॉय यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. मात्र, त्याचवेळी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या रोषालाही ते बळी पडले आहेत. त्यामुळे त्यातून त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई होण्याची भीती
जाणकारांनी वर्तविली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख