'शिंदे'शाही राष्ट्रवादीकडून पिंपरीतून लढणार? आज निर्णय अपेक्षित

प्रसिद्ध गायक डॉ.उत्कर्ष शिंदे यांना शिवसेनाच नाही,तर भाजप आणि राष्ट्रवादीनेही विधानसभा निवडणुक लढण्याचे आमंत्रण दिले आहे. मात्र, ते राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी या राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.
'शिंदे'शाही राष्ट्रवादीकडून पिंपरीतून लढणार? आज निर्णय अपेक्षित

पिंपरी : प्रसिद्ध गायक डॉ.उत्कर्ष शिंदे यांना शिवसेनाच नाही,तर भाजप आणि राष्ट्रवादीनेही विधानसभा निवडणुक लढण्याचे आमंत्रण दिले आहे. मात्र, ते राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी या राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय आज सायंकाळी शरद पवार यांच्याबरोबर मुंबईत होत असलेल्या बैठकीनंतर होण्याचा संभव आहे. खुद्द डॉ. उत्कर्ष यांनीच  'सरकारनामा'शी बोलताना त्याला दुजोरा दिला.

डॉ. उत्कर्ष यांना शिवसेनेची ऑफर ही गावाकडे (मोहोळ) लढण्याची आहे. तर, राष्ट्रवादीने त्यांना पिंपरीतून लढण्याची मुभा दिली आहे. ते पिंपरी मतदारसंघातच राहत असून येथेच त्यांचा दवाखाना, मित्र, हितचिंतक अधिक आहेत. त्यामुळे पिंपरीतून लढण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे डॉ. उत्कर्ष यांनी सांगितले. भाजपनेही ही ऑफर दिली होती. मात्र, त्यांची विचारसरणी मान्य नसल्याने त्यांचा विचारच केला नाही. त्यामुळे आता माझ्यासमोर फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोनच पर्याय आहेत. त्यातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. तसेच त्यांची ऑफर ही मला सोईचीही असल्याने राष्ट्रवादीला प्राधान्य असेल, असे डॉ. उत्कर्ष म्हणाले. आपण समाजकार्य करण्यासाठी राजकारणात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आठवडापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिंदे पितापूत्रांना ऑफर दिली आहे. शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहूल शेवाळे व डॉ. उत्कर्ष यांचे वडिल आनंद शिंदे हे चांगले मित्र आहेत. त्यातूनच शेवाळेंच्या शिष्टाईतून ठाकरे आणि शिंदेशाहीची भेट झाली. त्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला,तर डॉ. उत्कर्ष यांना विधानसभेसाठी मोहोळ राखीव मतदारसंघातील उमेदवारी देण्याचे कबूल करण्यात आले. तर आनंद शिंदेना विधानपरिषदेवर घेण्याची ऑफर देण्यात आली.

पिंपरीत सध्या शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार आहेत. तर मोहोळ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्याला सुरुंग लावण्यासाठीच शिंदेशाहीतील डॉ.उत्कर्ष यांचा वापर मोहोळला करण्याचा शिवसेनेचा विचार आहे.तर, शिरूरला लोकसभेला वापरलेला डॉ. अमोल कोल्हे पॅटर्न विधानसभेला पिंपरीत आजमावयचा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे. शहरातील तीनपैकी हाच मतदारसंघ पुन्हा पक्षाकडे येईल,असा राष्ट्रवादीचा होरा आहे. त्यासाठी डॉ. उत्कर्ष यांना खुद्ध शरद पवार यांनीच ऑफर दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com