pimpri-ncp-not-a-single-representative-from-pimpri-chinchwad | Sarkarnama

`राष्ट्रवादी'च्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरीला पुन्हा डावलले 

उत्तम कुटे 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काल (ता.21) जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरी-चिंचवड शहराला (जिल्हा) पुन्हा डावलण्यात आले आहे. पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या या शहरातून कुणाचीही वर्णी न लागल्याने शहरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी,तर ती स्पष्ट बोलूनही दाखविली. 

पिंपरीः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काल (ता.21) जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरी-चिंचवड शहराला (जिल्हा) पुन्हा डावलण्यात आले आहे. पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या या शहरातून कुणाचीही वर्णी न लागल्याने शहरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी,तर ती स्पष्ट बोलूनही दाखविली. 

सुनील तटकरे यांच्या गत कार्यकारिणीतही उद्योगनगरीला स्थान नव्हते. त्यामुळे यावेळी जयंत पाटील यांच्या कारकिर्दीत ते मिळेल, अशी आशा शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना होती. लोकसभा निवडणूक काही महिन्यावर आली असताना प्रदेश कार्यकारिणीत कुणाचा,तरी समावेश करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, काल जाहीर झालेल्या या कार्यकारिणीत ती फलद्रूप न झाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. 

दुसरीकडे पुणे शहरातून माजी महापौर राजलक्ष्मी भोसले (उपाध्यश्र) व कृष्णकांत कुदळे (सरचिटणीस) यांची, तर पुणे जिल्ह्यातून माजी जिल्हाध्यश्र सुरेश घुले (उपाध्यक्ष) आणि जालिंदर कामठे (सरचिटणीस) यांची निवड निवड झाली आहे. पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून दोघा दोघांना स्थान देताना पिंपरीतून किमान एकाला,तरी घ्यायला हवे होते, अशी भावना शहर पक्षातून व्यक्त होत आहे. 

शहरातील माजी आमदार (पिंपरी) अण्णा बनसोडे यांनी याबाबत दादा (अजित पवार) निर्णय घेतात, असे सांगून अधिक बोलणे टाळले. मात्र, दुसरे माजी आमदार भोसरीचे विलास लांडे यांनी,मात्र त्याबद्दल नाराजीच नव्हे, तर संतापच व्यक्त केला. 
आम्हाला राज्य कार्यकारिणीत घेतले,तर पद घेणार ना? का त्यांच्या मागे लागणार? अशी नाराजी त्यांनी वर्तविली. 

ते म्हणाले, "हे शहराचे दुर्दैव आहे. पिंपरी-चिंचवडला नेहमीच डावलले जाते. मग ती विधानपरिषद निवडणूक असो वा राज्यसभेची उमेदवारी. आगामी निवडणुकीतील उमेदवारी व कार्यकारिणीत स्थान याचा काहीही सबंध नाही. त्यामुळे कुणाला,तरी त्यात स्थान मिळायला हवे होते''.

दुसरीकडे राज्य कार्यकारिणीसाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी नावेच दिली नसल्याचे समजले. त्याला त्यांनीच आज सरकारनामाशी बोलताना दुजोरा दिला. शहराला सलग दुसऱ्यांदा प्रदेश कार्यकारिणीत का डावलले यामागील कारणमीमांसा त्यांना करता आली नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख