खासदार बारणे हे `फोटोवाला खासदार' : आमदार जगताप 

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा `फोटोवाला खासदार' अशी संभावना भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज केली.
खासदार बारणे हे `फोटोवाला खासदार' : आमदार जगताप 

पिंपरीः शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा `फोटोवाला खासदार' अशी संभावना भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज केली. 

महापालिका निवडणुकीत अवघे दोन नगरसेवक निवडून आणण्याची पात्रता असलेल्या बारणे यांना दिल्लीपेक्षा गल्लीतच जास्त रस असल्याची टीकाही त्यांनी केली. यामुळे लोकसभेच्या या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांतील कलगीतुरा चौथ्या दिवशीही सुरूच राहिला. तसेच तो लगेच थांबण्याचीही शक्‍यता दिसत नाही. 

याअगोदरही या ना त्या कारणामुळे या दोघा कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांत आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडलेल्या आहेत. अगदी एकमेकांना समोरासमोर येण्याचे आवाहनही देण्यात आलेले होते. नंतर, हे वादळ शमले होते. आता ते एकदा उफाळून आले आहे. चार दिवसांपूर्वी बारणे यांनी त्याला तोंड फोडले. त्यानंतर हा कलगीतुरा सुरूच राहिलेला आहे. आम्ही सगळे भाऊ, सारे मिळून खाऊ, असा कारभार सध्या भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड पालिकेचा सुरू असल्याचे शरसंधान बारणे यांनी काल केले होते. शहरातील इतरही प्रश्‍नांवरून त्यांनी शहराचे कारभारी असलेल्या जगतापांना लक्ष्य केले होते. त्याला जगतापांनी आज तसेच सडेतोड उत्तर दिले. 

दरम्यान, लोकसभेसाठी युती झाली,तर या दोघांची मोठी अडचण होणार आहे. युती झाली,तर ही जागा शिवसेनेकडेच राहण्याची शक्‍यता आहे. तसेच त्यांचे उमेदवार बारणे हेच जवळपास नक्की आहते. अशा स्थितीत जगताप हे बारणेंना कशी मदत करतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

यासंदर्भात काढलेल्या पत्रकात जगताप म्हणतात, "दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात फोटो काढणारा खासदार म्हणून बारणे ओळखले जातात. आम्ही चांगल्या कामासाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी या फोटोवाल्या खासदाराने चांगल्या आवाहनाचेही राजकीय भांडवल करून पुन्हा प्रसिद्धी मिळवण्याची पुरेपूर संधी साधली. पंतप्रधानांपासून ते अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे जायचे आणि एखादे निवेदन देऊन त्यांच्यासोबत फोटोसेशन करायचे. त्यानंतर त्याची भरपूर प्रसिद्धी मिळवायची.प्रत्यक्षात प्रश्न मात्र जैसे-थे ठेवायचे, हीच त्यांची राजकीय पद्धत राहिली आहे. मोदी लाटेच्या कृपेमुळे त्यांना खासदारकीची लॉटरी लागली. त्याचा उपयोग केंद्राशी संबंधित जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना करता आला नाही. ऊठसूट महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यावरून हे स्पष्ट होते.''
 
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या सात-आठ महिन्यांवर आल्यामुळे केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या रेडझोनसह अन्य प्रश्नांवर लोकांना काय उत्तर द्यायचे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे दिल्लीतल्या नेत्यांसोबत फोटोसेशन केल्यानंतर आता गल्लीतील गोष्टींवरून ते प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी धडपडत आहेत. पिंपरी महापालिकेत खाबुगिरी असेल, तर चारवेळा नगरसेवक राहिलेल्या बारणे यांनी त्याचे पुरावे द्यायला कोणी अडविले आहे. मोघम आरोप करून आपण खरोखरच फोटोवाला खासदार असल्याचे ते स्वतःहून जनतेसमोर सिद्ध करत आहेत. या फोटोवाल्या खासदाराला ते स्वतः राहत असलेल्या थेरगाव भागातून महापालिका निवडणुकीत अवघे दोन नगरसेवक निवडून आणता आले आहेत. खासदार झाल्यानंतर त्यांनी केवढी मोठी राजकीय उंची गाठली आहे, हे यावरून स्पष्ट होते. याच राजकीय कतृत्वाच्या जोरावर आपण 2019 ला पुन्हा खासदार होण्याची वल्गना त्यांनी जरूर कराव्यात. परंतु, फोटोवाला खासदार हवा की दिल्लीतील प्रश्न सोडवणारा खासदार हवा, हे पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ जनतेला आता चांगलेच कळून चुकले आहे, अशी टीका आमदार जगताप यांनी बारणे यांच्यावर केली.

पिंपरी-चिंचवडमधील रस्ते मोठे आणि प्रशस्त आहेत. तरीही शहरातील बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते, हे वास्तव आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासन आपल्या स्तरावरून कारवाई करत असते. परंतु, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही बारणे यांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. तसेच विकासाची दूरदृष्टी असेल, तर ते स्वतः राहत असलेल्या थेरगाव परिसराचा विकास करण्याचे आव्हानही आपण दिले होते. नागरिकांच्या प्रश्नांचा खूपच कळवळा असल्यासारखे वागणाऱ्या बारणे यांनी हे आव्हान स्वीकारून पुढे येत अतिक्रमणांवर कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढाकार घेतील, अशी शहरातील जनतेची अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनी आमच्या आवाहनाचेही राजकीय भांडवल करून त्यांनी प्रसिद्धी मिळवलीच, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com