pimpri-mayor-rahul-jadhav-apoligize | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडच्या नव्या महापौरांना अपशकून; पहिल्याच दिवशी माफीची पाळी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मंत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर राहूल जाधव यांना कामकाजाच्या पहिल्या दिवशीच माफी मागायची पाळी आली. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निवडीनंतर झालेला जल्लोषही भोवला आहे. त्याबद्दल त्यांच्या दोनशे कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला.

पिंपरीः श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर राहूल जाधव यांना कामकाजाच्या पहिल्या दिवशीच माफी मागायची पाळी आली. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निवडीनंतर झालेला जल्लोषही भोवला आहे. त्याबद्दल त्यांच्या दोनशे कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला.

भाजपचे दुसरे महापौर असलेले जाधव यांच्या निवडीनंतर शनिवारी (ता.4) पालिका मुख्यालयात मोठा जल्लोष झाला होता. त्यावेळी पन्नासेक पोती भंडारा उधळला गेला. जेसीबीवरून तो टाकला गेला. त्यात पाऊस झाला. त्यामुळे या भंडाऱ्याचा चिखल झाला.त्यावरून दुचाक्या घसरून काहीजण जखमी झाले होते. या जल्लोषाचा सर्वसामान्यांना फटका बसला. तसेच पालिका आवार व तेथे उभ्या असलेल्या मोटारी भंडाऱ्याने माखून गेल्या. त्याबद्दल महापौरांनी आज कामकाजाच्या पहिल्याच दिवशी माफी मागितली. तरीही प्रशासनाने त्याबाबत पोलिसांत तक्रार दिली. 

मुंबई पोलिस कायद्यान्वये महापौरांच्या दोनशे समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, ही नोंद अज्ञात व्यक्ती अशी पिंपरी पोलिसांनी केली आहे. 

पालिका आवारात सीसीटीव्ही आहेत. त्यात हा जल्लोष कैद झाला आहे.त्याचा आधार घेऊन भंडारा उधळणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नवीन महापौर निवडीला हा पहिला अपशकून झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आज रंगली होती. तसेच त्यावरून महापौरांना माफीही मागावी लागल्याने तो चर्चेचा विषय झाला. 

दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष राष्ट्रवादीने पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या केबिनमध्ये दीड तास नुकतेच कोंडले होते. त्याबद्दलही असाच गुन्हा दाखल झाला आहे. त्यातही अशीच कारवाई पोलिसांकडून होणार आहे. त्याबद्दल विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी संताप व्यक्त केला. आता आम्ही आमच्या केबिनमध्ये बसतो आणि तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना पोलिस ठाण्यावर पाठवून देतो. सोडवू द्या पोलिसांना त्याचे प्रश्न अशी उद्वीग्न प्रतिक्रिया साने यांनी त्यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या 11 नगरसेवकांच्या दाखल झालेल्या गुन्ह्यावर आज दिली. 

पोलिस दडपशाही करीत आहेत. तसेच ते राजकीय दहशतीखाली असून सत्ताधा-यांना सहकार्य करतात,असा आरोपही त्यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख