खासदार आढळराव, बारणे यांच्या निधीतील कामाची चौकशी करतोय तोतया अधिकारी

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळरावदादा-पाटील व श्रीरंगअप्पा बारणे यांच्या निधीतील कामांची चौकशी एक तोतया सरकारी अधिकारी करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
खासदार आढळराव, बारणे यांच्या निधीतील कामाची चौकशी करतोय तोतया अधिकारी

पिंपरीः शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळरावदादा-पाटील व श्रीरंगअप्पा बारणे यांच्या निधीतील कामांची चौकशी एक तोतया सरकारी अधिकारी करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर तोतया अधिकारी हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा दावा आढळराव यांनी केला आहे. त्याने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक (ब्लॅकमेल) केली असल्याचा संशय व्यक्त करून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची लेखी मागणी त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) संदीप पाटील यांच्याकडे केली केली आहे. 

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती अधिकारांतर्गत वरील दोन खासदारांच्या निधीतून झालेल्या कामाची माहिती या तोतयाने घेतली. त्याआधारे ही कामे झालेल्या ठिकाणी तो जात आहे. तेथे गेल्यानंतर मी मंत्रालयातून आल्याचे सांगतो आहे. तुमच्या इथे खासदार निधीतून झालेली कामे व त्याची बिले दाखवा असे तो दरडावतो. त्याच्या ओळखपत्राची मागणी करताच तुम्हाला तो अधिकार नसल्याचे बिनदिक्कतपणे सांगत आहे. पाबळ येथील भैरवनाथ विद्यालयाच्या प्राचार्यांच्या प्रसंगावधानतेमुळे हा बनाव उघडकीस आला. हा तोतया तेथून पळून जाण्यास यशस्वी झाला. शासकीय अधिकारी हा शासकीय मोटारीऐवजी मोटारसायकलवरून आल्याने प्राचार्यांना संशय आला होता. हा प्रकार गंभीर असून या तोतयाने ब्लॅकमेल करून अनेकांची फसवणूक केली असल्याचा संशय आहे. फक्त आम्हा दोन खासदारांच्याच निधीतील कामांची हा तोतया चौकशी करीत असल्याने तो भाजपचा पदाधिकारी असावा, असा संशय आढळराव यांनी व्यक्त केला आहे. मंत्रालय अथवा जिल्हा नियोजन मंडळाकडून खासदार निधीतील कामांच्या चौकशीसाठी असा अधिकारी नेमलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अशी कोणी चौकशी करीत असेल, तर त्याविरुद्ध जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

श्रीराम अशोकसिंह परदेशी (रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी-चिंचवड) असे या तोतयाचे नाव आहे. त्याने पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्‍यातील पाबळ गावात दोन शाळांत जाऊन तेथे खासदार निधीतून झालेल्या कामाची चौकशी केली आहे.तेथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या भैरवनाथ विद्यालयात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार 18 तारखेला पडला. त्याबाबत संस्थेचे खजिनदार सोपान जाधव यांनी लगेच पाबळ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यादिवशी परदेशी हा मोटारसायकलवरून आणखी दोघांसह या शाळेत गेला. खासदार निधीतून तुमच्या प्रयोगशाळेला साहित्य मिळाले असून ते व त्याची बिले दाखवा, असे तो म्हणाला. त्यावर त्याच्या ओळखपत्राची मागणी करताच तुम्हाला तो अधिकार नाही, असे उलट त्यानेच दरडावले. नंतर तो निघून गेला. मात्र,संशय आल्याने शाळेच्या शिपायाने त्याचा पाठलाग केला असता तो दुचाकीवरून (एमएच-14-सीआर-5188) आल्याचे समजले. त्यामुळे संशय आणखी बळावला. त्यातून पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात चौकशी केली असता ही गाडी श्रीराम परदेशी या व्यक्तीची असून तो पिंपरीतील अजमेरा कॉलनीत राहत असल्याचे समजले. यानंतर हा बनाव असल्याचे लक्षात आले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com