Pimpri : cotracters desperate for 400 crore bills | Sarkarnama

सत्ताबदलानंतर ठेकेदारांचे धाबे दणाणले  चारशे कोटींच्या थकबाकीसाठी धावाधाव 

उत्तम कुटे
शनिवार, 1 एप्रिल 2017

पारदर्शक आणि प्रामाणिक कारभार करणार असून एकेका रुपयाचा योग्य तोच विनियोग करणार असल्याची घोषणा सावळे यांनी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ठेकेदारांची झुंबड पालिकेत उडाली.

पिंपरी:  पालिका अधिकारी,पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताच्या भ्रष्टाचारावर पहिला घाव असेल, अशी घोषणा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या नवनियुक्त अध्यक्षा सीमा सावळे यांनी शुक्रवारी (ता.31) करताच विकासकामे करणाऱ्या उद्योगनगरीतील शेकडो ठेकेदारांचे धाबे दणाणले असून आपल्या चारशे कोटी रुपयांच्या थकीत बिलांच्या (देयके) वसुलीसाठी दीडदोनशे ठेकेदारांनी शनिवारी (ता.1) पालिकेत धाव घेतली.

 महापौर नितीन काळजे यांच्यासमोर त्यांनी ठाण मांडले. मात्र, त्यांनी वेळेत बिले न दिल्याने आर्थिक वर्ष संपल्याचे कारण देत पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे ही बिले अदा करण्यास नकार दिला. त्यामुळे ठेकेदार हबकले असून निवडणूक आचारसंहितेमुळे अडकलेली दोन महिने अडकून पडलेली ही रक्‍कम मिळण्यास आता आणखी तेवढाच कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्याचा फटका नव्या विकासकामांना बसणार असून ती जलदगतीने होण्यात अडथळा येऊ शकतो, असे पालिका सूत्रांनी सांगितले. दरम्यान, थकलेली बिले ही यापूर्वी पालिका सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या काळात झालेल्या कामांची असून आता सत्तेत आलेल्या भाजपनेच ती अडविल्याची चर्चा पालिका वर्तूळात रंगली. 

पारदर्शक आणि प्रामाणिक कारभार करणार असून एकेका रुपयाचा योग्य तोच विनियोग करणार असल्याची घोषणा सावळे यांनी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ठेकेदारांची झुंबड पालिकेत उडाली. विविध पालिका खात्यांशी संबंधित हे ठेकेदार असले,तरी त्यात बहुतांश हे स्थापत्य विभागाशी संबंधित होते. त्यातील एकेकाची लाखो रुपयांची बिले अदा होणे बाकी आहे. पालिकेतील नव्या सत्ताधाऱ्यांनी व त्यातही ठेकेदारांना दिली जाणारी कामे मंजूर करणाऱ्या स्थायीच्या अध्यक्षांनी टक्केवारी आणि भ्रष्ट कारभार याविरुद्ध काल एल्गार केल्यानंतर ठेकेदार धास्तावल्याचे दिसून आले. त्यांनी महापौर दालनात ठाण मांडले.

 गेली तीन-चार वर्षे मार्च संपूनही बिले दिली जात होती. यावेळी,मात्र लांडे यांनी ती अडवून ठेवली असल्याचा आरोप ठेकेदारांच्या वतीने यावेळी बिपिन नाणेकर यांनी केला. त्यामुळे महापौरांनी लांडे यांना बोलावले. त्यांनी आर्थिक वर्ष संपल्याने 31 मार्च या मुदतीत न आलेली बिले अदा न करण्याचे नियम सांगितला. दरम्यान, आर्थिक वर्ष संपल्याने गेल्या वर्षात तसेच त्यापूर्वी झालेल्या कामांची बिले आता अदा करता येणार नसल्याचे लांडे यांनी महापौरांना सांगितले. त्यामुळे आयुक्तांशी बोलून यावर तोडगा काढता येतो का पाहू असे महापौरांनी सांगितले. 

मात्र, दोन आचारसंहिता व पालिका निवडणुकीत अधिकारी गुंतल्याने ठेकेदारांनी केलेल्या कामाची बिले त्या त्या विभागांकडून लेखा विभागाला सादर करण्यास विलंब झाल्याचा फटका बसल्याचे अनेक ठेकेदारांनी सांगितले. त्यात या आर्थिक वर्षातील कामासाठीची तरतूद मिळाली नाही, तर ती लॅप्स होणार असल्याने पुढील वर्षी पुन्हा ती वर्गीकरण घेण्यासाठी मोठा वेळ जाणार असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, गेल्या जून, जुलै महिन्यात झालेल्या कामाची बिले आता ठेकेदार सादर करू लागले असून काहींनी तर 2014 मध्ये पूर्ण केलेल्या कामांबद्दल आता ती दिली असल्याचे लेखा विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे ती देता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 
 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख