लाचखोरीत शिक्षा होऊनही 23 जणांची बडतर्फी नाही

लाचखोरीच्या गुन्ह्यांत शिक्षा होऊनही 23 सरकारी कर्मचारी व अधिकारी (लोकसेवक) यांच्यावर सरकार मेहेरबान आहे. त्यांना अद्याप बडतर्फ करण्यात आलेले नाही.
लाचखोरीत शिक्षा होऊनही 23 जणांची बडतर्फी नाही

पिंपरीः लाचखोरीच्या गुन्ह्यांत शिक्षा होऊनही 23 सरकारी कर्मचारी व अधिकारी (लोकसेवक) यांच्यावर सरकार मेहेरबान आहे. त्यांना अद्याप बडतर्फ करण्यात आलेले नाही. 

यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्यातील सर्वाधिक चार अधिकारी आहेत. तर, त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या महसूल खात्याचा (दोन) नंबर लागतो. 

लाच घेऊनही 163 लोकसेवकांवरही सरकारची कृपा आहे. त्यांना निलंबित करण्यात आलेले नाही. त्यात तब्बल 120 अधिकारी आहेत. विनोद तावडे यांच्या शिक्षण विभागातील सर्वाधिक म्हणजे 36 जणांचा त्यात समावेश आहे. त्यानंतर (33) ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे खाते आहे. 

लाच घेताना पकडल्यानंतर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्याला निलंबित केले जाते. तर, या गुन्ह्यात दाखल खटल्यात शिक्षा झाल्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात येते. मात्र, शिक्षा होऊनही 17 विभागातील 23 जणांना सरकारने बडतर्फ केलेले नाही, अशी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचीच (एसीबी) आकडेवारी सांगत आहे. त्यात 22 अधिकारी आहेत. गृह आणि महसूल या खात्यांतच लाचखोरीसाठी शर्यत लागलेली असते. एखाद्या वर्षी गृह,तर दुसऱ्या वर्षी महसूल खाते अव्वल असते. यावर्षी लाचखोरीत शिक्षा झालेल्यांतही गृहविभाग (दहा) अव्वल आहे. तर,त्यानंतर महसूल विभागाचा नंबर (8) लागतो. शिक्षेनंतर बडतर्फ न करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्यांतही गृह आणि महसूल ही खाती एक व दोन नंबरवर आहेत. त्यानंतर आरोग्य व ऊर्जा विभागातील प्रत्येकी दोघांना अद्याप बडतर्फ करण्यात आलेले नाही. तर इतर 13 विभागातील एकेका लाचखोराचा या शिक्षा होऊनही बडतर्फ न झालेल्यांत समावेश आहे. सर्वाधिक (6) बडतर्फ न केलेले लाचखोर हे एसीबीच्या ठाणे विभागात असून त्यानंतर मुंबईचा (5) नंबर लागतो. 

निलंबित न करण्यात आलेल्यांत 27 क्‍लास वन अधिकारी आहेत. "एसीबी'च्या नांदेड परिक्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 35 जणांना निलंबित करण्यात आलेले नाही. तर,मुख्यमंत्र्यांचे शहर असलेले नागपूर दुसऱ्या क्रमाकांवर असून त्या परिक्षेत्रातील 32 जण लाच घेऊनही अद्याप सेवेत आहेत. दरम्यान,यावर्षीही अद्याप पुणे विभाग लाचखोरीच्या कारवाईत राज्यात अव्वल आहे. राज्यातील 673 पैकी दीडशे ट्रॅप पुणे एसीबीने केले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com