दहा वेळा फायरिंग करुन मारेन; युवक काँग्रेसच्या सरचिटणीसाची बिल्डरला धमकी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस गणेश गायकवाड याच्याविरुद्ध आता दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दहा वेळा फायरिंग करुन मारेन; युवक काँग्रेसच्या सरचिटणीसाची बिल्डरला धमकी
youth congress leader ganesh gaikwad threatens builder

पिंपरी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा (Youth Congress) सरचिटणीस आणि उद्योगपती गणेश नानासाहेब गायकवाड (Ganesh Gaikwad) (वय ३६, रा. एनएसजी हाऊस,आयआयटी रोड, औध, पुणे) याच्याविरुद्ध आता दरोड्याचा (Dacoity) गुन्हा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Police) दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध आठ दिवसांपूर्वीच नऊ कोटी रुपयांची जमीन बळकावून फसवणूक केल्याचा गुन्हा शहर पोलिसांनी नोंद केलेला आहे. दरम्यान, गायकवाड फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंजवडी पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यापूर्वीच सांगवी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा गायकवाडविरुद्ध काल दाखल झाला. बांधकाम व्यावसायिक असलेला गायकवाड याच्याविरुद्धच्या या दोन्ही गुन्ह्यातील फिर्यादीसुद्धा त्याच व्यवसायातील आहेत.कालच्या गुन्ह्यातील फिर्यादींच्या जागेत घुसून त्यांनाच गायकवाडने पुन्हा तेथे आलात,तर दहावेळा फायरिंग करेन, असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली आहे.

गायकवाड हा २०१९ च्या विधानसभेला भाजपकडून इच्छुक होता. त्याने गेल्या महिन्यातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.त्यानंतर त्याला लगेचच पद देण्यात आले होते. मात्र, महिन्यातच त्याच्याविरुद्ध दोन फौजदारी गु्न्हे दाखल झाल्याने त्याचे हे पद औटघटकेचेच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

हेही वाचा : माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचे हेलिकॉप्टर चार पक्ष फिरून अखेर राष्ट्रवादीत लँड! 

बांधकाम क्षेत्रातील एनएसजी ग्रूपचे व्य़वस्थापकीय संचालक असलेल्या गायकवाड यांनी सूस (ता.मुळशी,जि.पुणे) येथील आपला दीड एकरचा प्लॉट बळकावून त्यात अतिक्रमण केल्याची फिर्याद पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विजय वसंत कुलकर्णी (वय ५८, रा. कर्वेनगर,पुणे) यांनी दिल्यानंतर १६ जूनला हिंजवडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. कुलकर्णींच्या ट्रिनीटी रिऍलिटी फर्मची सूस येथील ६० गुंठे जागा बेकायदा पद्धतीने पत्र्याचे आणि तारेचे कुंपण करून गायकवाडने बळकावल्याचा आरोप आहे.या गुन्ह्यात आरोपी गायकवाड मिळून येत नसल्याचे तपासाधिकारी खाडे यांनी 'सरकारनामा'ला आज सांगितले. 

कालच्या ताज्या गुन्ह्यातील फिर्यादी अजिंक्य विठ्ठल काळभोर (रा.आकुर्डी, पिंपरी-चिंचवड) यांचा सुद्धा कन्स्ट्रक्शनचाच व्यवसाय आहे. त्यात गणेशचे वडील नानासाहेब, त्याचे साथीदार गणेश साठे, राजा आणि इतर तीनजण आरोपी आहेत. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोर हे पिंपळे निलख येथील आपल्या जागेत बांधकाम करण्यासाठी मजूर व ठेकेदारासह गेले असता त्यांना गायकवाड व साथीदारांनी शिवीगाळ करीत काम बंद पाडले. तसेच तेथील ४८ हजार रुपयांचे साहित्य धमकावून नेले. तसेच पुन्हा येथे फिरकलात,तर दहावेळा फायरिंग करेन, असे म्हणत काळभोरांना त्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. गायकवाड फरार झाल्याचे या गुन्ह्याचे तपासाधिकारी विनोद शेंडकर यांनी सांगितले. दरम्यान, गायकवाडचा मोबाईल फोन बंदच येत असल्याने त्याची बाजू समज शकली नाही.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in