प्रशिक्षणाऐवजी आजारपणाच्या रजेवर जाणं भोवलं; तीन पोलिसांच्या नोकरीवर गदा - three police personal suspended for not joining training in pimpari chinchwad | Politics Marathi News - Sarkarnama

प्रशिक्षणाऐवजी आजारपणाच्या रजेवर जाणं भोवलं; तीन पोलिसांच्या नोकरीवर गदा

उत्तम कुटे
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

प्रशिक्षणासाठी न जाता आजारपणाच्या रजेवर जाणे तीन पोलिसांनी चांगलंच महागात पडले आहे. 

पिंपरी : फोर्स वनच्या प्रशिक्षणासाठी न जाता आजारपणाच्या रजेवर जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तीन पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या पाचपैकी फक्त एकजणच ४ तारखेपासून या प्रशिक्षणाला गेला आहे. दरम्यान,त्यासाठी टाळाटाळ केलेल्या चौथ्या पोलिसावरही अशीच निलंबनाची कारवाई होणार असल्याचे समजते.

अडीच वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पिंपरी आयुक्तालयात दहशतवादविरोधी पथक निर्माण करण्यात यामुळे थोडा अडथळा आला आहे. या विशेष पथकासाठी या पाच तरुण पोलिसांची निवड प्रशिक्षणाकरिता झाली होती. मात्र,त्यातील चौघांनी त्याला दांडी मारल्याने या पथक निर्मितीला काहीसा ब्रेक लागला आहे. आता पुन्हा नव्या पोलिसांची निवड त्यासाठी करावी लागणार आहे.या प्रशिक्षणाला जावे लागू नये म्हणून  निलंबित तिन्ही पोलिसांनी एकदम  'सिक रिपोर्ट' केला. म्हणजे त्यांनी आजारी असल्याचे कळविले.मात्र,त्यांचा हा खोटेपणा उघडकीस येताच त्यांच्याविरुद्ध थेट निलंबनाची कडक कारवाई करून शिस्तबध्द दलात योग्य तो संदेश दिला गेला.

कर्तव्यकठोर,प्रामाणिक व तडफदार पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मंजुरीने पोलिस उपायुक्त (परिमंडळ दोन) आनंद भोईटे यांनी हे निलंबन केले.चौथा पोलिस हा परिमंडळ एकमधील असल्याने त्या परिमंडळाचे पोलिस उपायुक्त त्याबाबत आदेश काढणार आहेत. विजय गायकवाड, श्रीकांत शिंदे आणि जुम्मा पठाण अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. गायकवाड व शिंदे हे वाकड, तर पठाण हे चिखली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्यासह पाचजणांची निवड ही दहशतवादविरोधी पथकाच्या प्रशिक्षणासाठी झाली होती.मात्र, त्यातील फक्त एकजणच त्यासाठी हजर झाला. तर, बाकीच्यांनी दांडी मारली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख