पोलिसांचा धाक होतोय कमी...पिंपरी-चिंचवडमध्ये 3 दिवसांत 3 पोलिसांवर हल्ले

पिंपरी-चिंचवड व परिसरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या तीन घटना तीन दिवसांतच घडल्या आहेत.
पोलिसांचा धाक होतोय कमी...पिंपरी-चिंचवडमध्ये 3 दिवसांत 3 पोलिसांवर हल्ले
three police personal attacked in pimpari in last three days

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimapri-Chinchwad) व परिसरात पोलिसांवर (Police) हल्ला होण्याच्या तीन घटना तीन दिवसांतच घडल्या आहेत. पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यानंतर आता वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आली आहे. रहाटणीफाटा येथील गुरुवारी (ता.२९) ही घटना घडली. 
 
वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणाने पोलिसाला धमकावलेही होते. तुझ्यासारखे पन्नास पोलीस रोज माझ्याकडे येतात, असे म्हणत तुला काय करायचे,ते कर, अशी धमकी देत त्याने पोलिसाला धक्काबुक्की केली होती. डॅशिंग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश असूनही, शहरातील पोलिसांची जरब कमी झाली की काय, अशी चर्चा पोलिसांवरील हल्ल्यांमुळे सुरु झाली आहे.

वाकड पोलिसांनी याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. राजू प्रकाश भाटी (वय ३६, रा.औंधगाव, पुणे) असे त्याचे नाव आहे. लॉकडाऊनच्या टेन्शनमुळे हे कृत्य घडले, असे नंतर पश्चाताप झालेल्या या आरोपीने पोलिसांना सांगितले. वाहतूक विभागातील महिला पोलीस नाईक रोहिणी किरण सूर्यवंशी (वय ३४) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की, सहकारी पाटील यांच्यासह मी वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी भाटी हा विनामास्क मोटार चालवताना दिसला. म्हणून त्याला थांबवून पावती करण्यास सांगितले असता तो भडकला. पावती फाडणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरु केली. तुझ्यासारखे पन्नास पोलीस माझ्याकडे दररोज येतात, असे म्हणत त्याने पाटील यांना धक्काबुक्की केली.

पोलिसांचा धाक कमी होत असल्याची गेल्या ७२ तासांतील पिंपरी आयुक्तालयातील ही तिसरी घटना आहे. पहिल्या घटनेत मंगळवारी एका टोळक्याने दिघी येथे परमेश्वर सोनके या पोलिसावर दोन दिवसांपूर्वी खुनी हल्ला केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेल पिंपळगाव (ता.खेड, जि.पुणे) येथे चाकण पोलीस ठाण्यातील फौजदार सुरेश झेंडे यांची मानगूट धरून त्यांना दोन तरुणांनी मारहाण केली. कारण मध्यरात्री विनामास्क हॉटेलाबाहेर बडबड करणार्या या दोघांना  झेंडेंनी हटकले होते. 

झेंडेना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमर शंकर मोहिते (वय २९,रा. मोहितेवाडी,शेल पिंपळगाव, ता.खेड) आणि गणेश प्रकाश गुंडाळ (वय २८, रा. भोसे, चाकण,ता.खेड) यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी (ता.29) वाहतूक पोलिसाला रहाटणीत धक्काबुक्की करण्यात आली.त्यातील आरोपी भाटीलाही न्यायालयीन कोठडी झाल्याची माहिती तपासाधिकारी एम. के. मणेर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in