कोरोना उपाययोजनांवरुन प्रशासनावर भाजप आमदारानंतर आता शिवसेनेचा खासदारही नाराज

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, कोरोना केअर सेंटर व्यवस्थापनात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन कमी पडत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
कोरोना उपाययोजनांवरुन प्रशासनावर भाजप आमदारानंतर आता शिवसेनेचा खासदारही नाराज
shiv sena mp shrirang barne meets pcmc commissioner

पिंपरी : कोरोना केअर सेंटर व्यवस्थापनात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन कमी पडत असल्याचा ठपका काल (ता.५) शहरातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी ठेवला होता. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही आज याचा पुनरुच्चार केला आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या लोकप्रतिनिधींचे कोरोनाच्या बाबतीत,मात्र एकमत दिसून आले. 

दोघांनीही खाटांची तथा ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. त्यासाठी जगताप यांनी खासगी रुग्णालयांचे आयसीयू बेड ताब्यात घ्या,अशी सूचना काल आयुक्तांना केली होती. अशीच मागणी बारणे यांनीही आज आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन केली. दोघांच्या मागणीत आणि प्रसिद्धीपत्रकात कमालीचे साम्य आढळून आले आहे. 

शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने बारणे यांनी आज आयुक्तांना भेटून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटांची मोठी कमतरता जाणवत असल्याने हॉस्पिटलमध्ये या खाटांमध्ये वाढ करण्याची सूचना केली.  रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा  तुटवडा दाखवून काळ्या बाजारात त्याची चढ्या दराने विक्री केली जाते. त्याला आळा घालावा, त्यावर नियंत्रण ठेवावे. तसेच लसीकरण केंद्रामध्येही वाढ करावी,असेही ते म्हणाले. त्यावर ऑक्सिजनयुक्त व   व्हेटिंलेटर  खाटा वाढविण्यात येतील,तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन चढ्या दराने विकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

महापालिकेच्या कोरोना वॉर रूमलाही बारणे यांनी भेट दिली. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला आघाडी शहर संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक निलेश बारणे तसेच, सरीता साने, रविंद्र नामदे आदी उपस्थित होते. खाटेअभावी एखाद्याच्या जीव जाता कामा नये,असे आयुक्तांच्या भेटीनंतर बारणे म्हणाले. त्यासाठी  खासगी रुग्णालयांना खाटा वाढविण्याची परवानगी तातडीने देण्यास त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in