
Chinchwad By Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाची मुलूखमैदान तोफ भास्कर जाधव आणि धनजंय मुंडे या तीन मोठ्या नेत्यांची मतदारसंघात (रहाटणी) आज सभा झाली. त्यात आक्रमक मुंडेनी तळागाळात सध्या चाललेली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचे सांगितले.
भीमाशंकरसह तीन ज्योर्तिलिंगे राज्याबाहेर पळविण्यात आली. आता ते पंढरपूरचा विठोबा नेण्यास कमी करणार नाहीत, असा हल्लाबोल मुंडे Dhananjay Munde यांनी यावेळी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटले होते. पण, आता २१ व्या शतकात सिंहासनासाठी यांनी सुरतला लोटांगण घातले, असा घणाघात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव न घेता केला.
हा ताजा इतिहास पुढे ऐकायचा नसेल आणि तळागाळात चाललेली लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर या निवडणुकीत कमाल करून दाखवा. भावनिक न होता काटेंना विजयी करण्याचा संकल्प करावे लागेल, असे आवाहन त्यांनी चिंचवडकरांना केले.
'अशी ही बनवाबनवी' आणि 'पळवापळवी' करून राज्यात शिंदे-फडणवीस (State Government) सरकार आल्याचा टोला मुंडेंनी यावेळी लगावला. त्यांच्या राज्यात दीड लाख रोजगार क्षमतेचा प्रकल्प (फॉक्सकॉन) पळवून नेण्यात आला. भीमाशंकरचे ज्योर्तिलिंग पळविले गेले. उद्या पंढरीचा विठोबाही पळवला जाईल. वर ते म्हणतील तिरुपतीचा बालाजी आणून देतो. अशांना तुम्ही मतदान करणार का? अशी विचारणा त्यांनी उपस्थितांना करताच नाही असा आवाज घुमला.
देशात नऊ वर्षे हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांची सत्ता असूनही असुरक्षिततेतून हिंदूना मोर्चे काढावे लागत आहेत. तर भाजपने काय केले, असा प्रश्नही मुंडे यांनी उपस्थित केला.
गेल्या पाच वर्षात पिंपरी-चिंचवडची (PCMC) वाट भाजपने (BJP) लावली, असा आरोप मुंडेंनी केला. भाजपने पिंपरीत कुत्रे नसबंदीतही भ्रष्टाचार केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. उंदीर घोटाळाही त्यांनी केला, असे ते म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्यांनी (भाजप) खोके दिले. इकडे (चिंचवड) ते पाकिटे देतील, याकडे त्यांनी लक्ष वेधत ती न घेण्याची सूचनाही मुंडे यांनी यावेळी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.