भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत 'कोरोना', 'एफडीआर'नंतर आता कचरा गैरव्यवहार

कोरोना साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, टीडीआर गैरव्यवहार यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत कचरा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत 'कोरोना', 'एफडीआर'नंतर आता कचरा गैरव्यवहार
police registers case against contractor of pcmc in garbage scam

पिंपरी : भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोरोना साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झालेला आहे. त्यानंतर एफडीआर गैरव्यवहारात सात गुन्हे दाखल होऊन त्यात एका महापालिका ठेकेदाराला नुकतीच अटकही झाली होती. आता महापालिकेत कचरा गैरव्यवहार उघड झाला असून, या प्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही गैरव्यवहारांची मालिका वर्षभरावर आलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला अडचणीची ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कोरोना साहित्य खरेदी बाजारभावापेक्षा काहीपट अधिक दराने करून त्यात कोट्यवधी रुपयांची मलई चाखल्याचा आरोप झाल्यानंतर एकही रुग्ण दाखल नसलेल्या भोसरीतील दोन कोरोना सेंटरच्या चालकाला सव्वातीन कोटी रुपये दिल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. त्यावर विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी हल्लाबोल करीत न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.  त्याआधी बनावट एफडीआर देऊन महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याबद्दल पालिकेच्या सात ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यात एका कंत्राटदाराला अटकही झाली आहे. 

हा गुन्हा व भोसरीतील बोगस कोरोना सेंटर चालकाला एकाही रुग्णावर उपचार न करता दिलेले सव्वातीन कोटी रुपयांचे प्रकरण ताजे असतानाच आता कचऱ्याचा नवा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कचऱ्याचे वजन वाढवून महापालिकेकडून अधिक बिल वसूल करण्यासाठी पालिकेने नेमलेल्या ठेकदाराच्या कर्मचाऱ्यांनी खासगी जागेतील कचरा उचलून महापालिकेला लाखो रुपयांना गंडा घातल्याचे हे प्रकरण आहे. शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांच्यामुळे महापालिकेची ही फसवणूक व कचऱ्यात होत असलेला गैरव्यवहार उजेडात आला.

शहरातील घरगुती कचरा उचलण्यासाठी पालिकेने ए.जी.एन्व्हायरो प्रा. लि.या कंपनीची नियुक्ती केली आहे. जेवढा कचरा उचलतील त्या प्रमाणात महापालिकेकडून या ठेकेदार कंपनीला पैसे दिले जातात. त्यामुळे कचऱ्याचे वजन वाढवून महापालिकेची आर्थिक लूट करण्यासाठी या ठेकेदार कंपनीच्या दोन घंटागाड्या वाकड येथील एका हॉटेल व वाईन शॉपचा खासगी कचरा गोळा करताना ७ फेब्रुवारीला कलाटेंना दिसल्या. त्याबाबत त्याच दिवशी महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शशिकांत मोरे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार दुसऱ्या दिवशी महापालिकेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याबद्दल ही ठेकदार कंपनी, तिचा प्रोजेक्ट हेड, सुपरवायझर, दोन वाहनचालक आणि तीन कचरावेचक अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी प्रशासनासह सत्ताधारी भाजप अडचणीत येण्याची चिन्हे दिसताच काल 'डॅमेज कंट्रोल'ला भाजपकडून सुरवात झाली. 

महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले. त्यात त्यांनी या कंत्राटदाराने राडारोडा, माती, दगडधोंडे टाकून वजन वाढवून बिले घेतली असल्याची शक्यता या पदाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.  त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून या ठेकेदारावर कडक कारवाई करावी, राजकीय दबाव झुगारून या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काल महापौर व पक्षनेत्यांनी केली. मात्र,याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्यात अटकेची कारवाई झाल्यावर त्यांनी ती केल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in