'मास्क'ची कारवाई पोलिसांच्या अंगाशी; तीन दिवसांत तीन पोलिसांवर हल्ला

पिंपरी महापालिका प्रशासनाने शहर पोलिसांना विनामास्क वावरणाऱ्यांवर दंडाच्या कारवाईचे दिलेले अधिकार त्यांच्यावरच बेतू लागले आहेत.
peoples attack police over mask fine in pimpari chinchwad
peoples attack police over mask fine in pimpari chinchwad

पिंपरी : पिंपरी महापालिका (PCMC) प्रशासनाने शहर पोलिसांना (Police) विनामास्क (Mask) वावरणाऱ्यांवर दंडाच्या कारवाईचे दिलेले अधिकार त्यांच्यावरच बेतू लागले आहेत. कारण त्यातून गेल्या तीन दिवसांत तीन पोलिसांना मारहाण झाली आहे. ताज्या घटनेत काल (ता.३०) पिंपरीच्या लालटोपीनगर झोपडपट्टीत एका पोलिसावर दोन सराईत गुन्हेगारांनी हल्ला केला. त्यात एका ज्येष्ठाचा समावेश आहे. 

आमच्यावर अनेक गुन्हे असल्याचे सांगत आणखी एका केसने काय फरक पडणार आहे,असे उद्दाम वक्तव्य या आरोपींनी केले. तर, दोघा-तिघांच्या नोकऱ्या आतापर्यंत घालवल्या असून आता तुझीही घालवतो,अशी धमकी या ज्येष्ठ नागरिकाने कारवाई करणाऱ्या पोलिसाला दिली. गेल्या चार दिवसांपासून पिंपरी पोलिस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारीच नाही,तर पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ले होण्याचे सत्र सुरु झाले आहे. ते थांबत नसल्याचे चित्र आहे. 

दिघी, चाकण आणि वाकडनंतर काल पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजे शहराच्या चारही भागांत पोलिसांना मारहाणीच्या तथा सरकारी कामात अडथळा आणल्याच्या घटना घडल्या आहेत. काल पिंपरीच्या लालटोपीनगरमध्ये पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पंडीत लक्ष्मणराव धुळगुंडे (वय ३१) हे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करीत होते. त्यावेळी त्यांनी मास्क न घालता फिरणारे रामदास सोपान लुकर (वय ६५) आणि संतोष पवार यांना दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावर ही माझ्या मालकीची जागा असून येथे आलाच कसा, अशी उलट विचारणा लुकर याने केली. 

त्यानंतर शिवीगाळ करीत आरोपींनी पोलिसाशी झटापट केली. त्यांचे पावतीपुस्तक हिसकावून घेतले. नोकरी घालवण्याची धमकीही दिली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून धुळगुंडे हे आरोपींना पोलीस चौकीवर घेऊन चालले होते. त्यावेळी पवार त्यांच्या हाताला हिसका देऊन पळून गेला तर, लुकरने तेथील बांबूने पोलिसावर हल्ला केला. तरीही धुळगुंडेनी त्याला पकडून चौकीवर नेलेच. 

या  घटनेच्या एक दिवस अगोदरच म्हणजे गुरुवारी (ता.२९) रहाटणीफाटा येथे वाहतूक पोलिस पाटील यांना राजू भाटी या विनामास्क मोटारचालकाने धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. त्याआधी बुधवारी शेल पिंपळगाव (ता.खेड,जि.पुणे) येथे विनामास्क फिरणाऱ्या अमर शंकर मोहिते (वय २९,रा. मोहितेवाडी,शेल पिंपळगाव, ता.खेड) व गणेश प्रकाश गुंडाळ (वय २८, रा. भोसे, चाकण,ता.खेड) यांची पावती करणारे  चाकण पोलिस ठाण्यावरील फौजदार तथा पीएसआय सुरेश झेंडे या पोलीस अधिकाऱ्याची मानगूट धरून त्यांना या तरुणांनी मारहाण केली होती.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com