तिजोरीच्या चाव्या कुणाकडे...स्थायी समितीची निवडणूक शुक्रवारी पण अध्यक्ष उद्याच कळणार!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या शुक्रवारी (ता.५) होणार असून हे पद भोसरीकडेच राहते की चिंचवडकडे जाते याकडे आता लक्ष लागले आहे
तिजोरीच्या चाव्या कुणाकडे...स्थायी समितीची निवडणूक शुक्रवारी पण अध्यक्ष उद्याच कळणार!
pcmc standing committee election will be on friday

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या शुक्रवारी (ता.५) होणार आहे. हे पद भोसरीकडेच राहते की चिंचवडकडे जाते याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी उद्या (ता.2) अर्ज दाखल केले जाणार असल्याने महापालिकेच्या खजिन्याची चावी कुणाकडे जाणार म्हणजे स्थायीचे अध्यक्ष कोण होणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे. 

अपक्ष आघाडीच्या नीता पाडाळे यांच्या स्थायीवरील नियुक्तीला महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेऊनही हा निवडणूक कार्यक्रम आज विभागीय आयुक्तांनी जाहीर केला. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून नुकतेच पिंपरी महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झालेले नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज उद्या दुपारी तीन ते पाच या वेळेत दाखल होणार आहेत. 

भाजपचे महापालिकेतील बहुमत पाहता त्यांचाच अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. पण, तो कोण होतो, हे उद्या कळणार आहे. कालच मुदत संपलेले मावळते अध्यक्ष संतोषअण्णा लोंढे हे शहराचे कारभारी आणि भोसरीचे भाजप आमदार महेशदादा लांडगे यांचे समर्थक आहेत. तर, महापौर माई ढोरे या शहराचे दुसरे कारभारी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पाठीराख्या आहेत. तिसऱे महत्वाचे सभागृहनेते पद हे नामदेव ढाके यांच्या रुपाने जुन्या भाजपाईकडे आहे. हाच फॉर्म्युला कायम राहिला, तर स्थायीचे अध्यक्षपद पुन्हा भोसरीतच राहील. मात्र, ते चिंचवड मतदारसंघात म्हणजे भाऊ समर्थकाकडे गेले, तर महापौर बदलाची शक्यता आहे.  

पाडाळे यांची या महिन्याच्या महापालिका सभेत झालेली निवड ही शासकीय नियमांना तसेच, सभाशास्त्राला धरून झाली नसल्याचे सांगत ती रद्द करण्याची लेखी मागणी कलाटे यांनी २२ तारखेला विभागीय आय़ुक्तांकडे केली होती. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीला तात्पुरता ब्रेक लागण्याची शक्यता होती. मात्र,ती नियमानुसार झाली असल्याचा खुलासा महापालिकेने विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केला. तो समाधानकारक वाटल्यानेच विभागीय आय़ुक्तांनी हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in