सरकारी कामाची अशीही तऱ्हा...सरळ, साध्या आयुक्तांना मिळेना अधिकाऱ्यांची साथ

वेगाने कोरोना पसरवणाऱ्या २५ हजार सुपरस्प्रेडरचे एका दिवसात लसीकरण करण्याचे लक्ष्यगाठण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेलाअपयश आले.
pcmc not completed target of vaccination of 25 thousand super spreaders
pcmc not completed target of vaccination of 25 thousand super spreaders

पिंपरी : वेगाने कोरोना पसरवणाऱ्या २५ हजार सुपरस्प्रेडरचे एका दिवसात लसीकरण करण्याचे लक्ष्य गाठण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेला काल (ता.५) अपयश आले. एकूणच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेचे फक्त कागदी घोडे प्रशासन नाचवित असून, नव्या साध्या, सरळ आयुक्तांना जुन्या अधिकाऱ्यांची अद्याप म्हणावी तशी साथ व सहकार्य मिळत नसल्याची चर्चा महापालिकेत आहे. 

कोरोना उपाययोजनात व त्यातही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात महापालिका प्रशासन कमी पडल्याचा ठपका कालच (ता ५) शहराचे कारभारी आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी ठेवत खासगी रुग्णालयांचे आयसीयू ताब्यात घेण्याची सूचना आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे. शहरात कोरोनाचा प्रकोप झाल्याने २५ हजार सुपरस्प्रेडरचे लसीकरण करण्याचे लक्ष्य महापालिकेने काल ठेवले होते. त्याची घोषणा आयुक्तांनीच परवाच्या आपल्या पहिल्यावहिल्या फेसबुक लाईव्हमध्ये केली होती. मात्र, काल एकूण १५ हजार 637 जणांनाच लस देण्यात आली. त्यातही खासगी रुग्णालयांचा वाटा एक हजार ९५० चा आहे. 

आतापर्यंत शहरात एक लाख ९८ हजार ७८४ जणांना ही लस दिली गेली आहे. त्यात खासगी रुग्णालयांचा हिस्सा ४५ हजार ९०७ एवढा आहे. कोरोना प्रतिबंधकच नव्हे,तर तो झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनेत महापालिका प्रशासन कमी पडल्याचे चित्र शहरात आहे. खुद्द काही नगरसेवक त्यातही महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच नाही, तर आमदाराही त्यावर खूष नसल्याचे दिसून आले आहे. उलट कोट्यवधी रुपयांची महापालिकेची वादग्रस्त कोरोना साहित्य खरेदी आणि एकाही रुग्णावर उपचार न करता महापालिकेने अदा केलेले सव्वा तीन कोटी रुपयांचे बिल वादात सापडले आहे. 

कोरोना सेंटरचा गैरकारभार समोर आलेला आहे. त्यात महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवकांचे लागेबांधे असल्याचा आरोपच झाला नाही, तर त्याबाबत विभागीय आयुक्तांपर्यंत तक्रार गेलेली आहे. आयुक्तांच्या निर्बंधांची काटेकोरपणे  पूर्ण अंमलबजावणी होत नाही. हातगाड्यांवरील विक्रीला बंदी असूनही ती सुरूच आहे. कोरोना रुग्ण आढळल्यावर त्याच्या संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग होत नाही. एवढेच नाही, तर त्याच्या कुटुंबातीलही सगळ्यांची किमान अँटीजेन टेस्ट केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. 

होम आयसोलेशनमधील रुग्णांबाबत, तर आनंदीआनंदच आहे.  त्यांच्यावर  लक्ष नसल्याने त्यातील अनेकजण व त्यातही तरुण बिनधास्त बाहेर फिरतात. त्याबद्दल आयुक्तांनीच परवाच्या फेसबुक लाईव्हमध्ये चिंता व्यक्त केली आहे. कोरोना हॉस्पिटल फुल्ल आणि कोरोना सेंटरमधील असुविधांमुळे  होम आयसोलेशनला  प्राधान्य दिले जात आहे. पण,तिथे योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळत नसल्याचे अनेक रुग्णांचे म्हणणे आहे. अशा रीतीने या रुग्णांची दुहेरी फरपट सुरु आहे.

महापालिकेचा वैद्यकीय विभाग कोरोनात अपयशी सिद्ध झाला असून त्याबद्दल स्थायी आणि महापालिका सभेतही चर्चा झालेली आहे. काहीशा म्रुदू स्वभावाच्या आयुक्तांचा गैरफायदा काही अधिकारी घेत असल्याने महापालिकेला आपले कोरोनाच्या उपाययोजना करण्यात अडचणी येत असल्याची कुजबुज ऐकायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com