आयुक्तांचा जोर का धक्का...मलईदार पोस्टवरील 44 अधिकाऱ्यांची उचलबांगडी - pcmc commissioner rajesh patil transfers 44 officers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

आयुक्तांचा जोर का धक्का...मलईदार पोस्टवरील 44 अधिकाऱ्यांची उचलबांगडी

उत्तम कुटे
सोमवार, 12 जुलै 2021

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचा धडाकेबाज कारभार सुरुच आहे. कोरोना काहीसा आटोक्यात आल्यानंतर त्यांनी आता प्रशासनावर पकड मजबूत करण्यास सुरवात केली आहे. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांचा धडाकेबाज कारभार सुरुच आहे. कोरोना काहीसा आटोक्यात आल्यानंतर त्यांनी आता प्रशासनावर पकड मजबूत करण्यास सुरवात केली आहे. त्यातून त्यांनी वर्षानुवर्षे एकाच विभागात व त्यातही मलईदार जागेवर ठाण मांडून बसलेल्या 44 अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. तीन सह शहर अभियंते, आठ कार्यकारी अभियंते, २९ उपअभियंते, चार सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांचा बदली (Transfers) झालेल्यांत समावेश आहे. 

काल रविवारी (ता.११) सुटीच्या दिवशी आयुक्तांनी सहा बदली आदेश काढून त्यात नंतर दबावातून काही बदल होणार नाही, याची काळजी घेतली. कारण बदली झालेल्यांना १४ तासांत आजपासूनच बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगण्यात आले आहे. नुकत्याच त्यांनी मुख्यालयात तळ ठोकून बसलेल्या लिफ्टमनलासुद्धा बाहेर बदलीवर पाठवून महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या जवळ असलेल्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर आता अशा अनेक राजकीय नेत्यांशी लागेबांधे असलेल्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी काल हा जोरदार धक्का दिला. 

बदलीनंतर नाराज असलेले रजेवर जातात. हे ध्यानात घेऊन बदली झालेल्या कुणाचीही रजा मंजूर करू नये, असे त्यांच्या विभागप्रमुखांना बजावण्याची काळजी आयुक्तांनी घेतली आहे. तसेच बदली झालेल्यांना ताबडतोब कार्यमुक्त करावे, तसेच बदलीच्या ठिकाणीही त्यांना लगेच हजर करून घ्यावे, अन्यथा सबंधित विभागप्रमुखांना जबाबदार धरले जाईल, असा सज्जड इशाराही देण्यात आला आहे. बदली करण्यासाठी कोणी राजकीय दबाव आणला, तर तशी नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही केली जाईल,असे बजावण्यात आले आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांवरील अतिरिक्त कार्यभार हा निरस्त करण्यात आल्याने त्यांना मुक्त करण्यातील मुख्य अडथळाही आय़ुक्तांनी हुशारीने अगोदरच दूर केला आहे. 

हेही वाचा : रविशंकर प्रसादांनाच्या त्यांच्याच खात्याच्या नव्या मंत्र्याचं कौतुक फार 

बदली झालेले अनेक अधिकारी हे एकाच विभागात सात वर्षांहून अधिक काळ होते. पालिकेच्या ४० विभागातील अशा अधिकाऱ्यांची संख्या १ हजार ७६७ इतकी आहे. त्यात २८ वर्षांपासून एका शाळेत असणारे शिक्षक, २६ वर्षे एकाच रुग्णालयात असणारे वॉर्डबॉय आहेत. सह शहर अभियंता मकरंद निकम, अशोक भालकर, सतीश इंगळे यांच्या बदलीबरोबर त्यांच्या पदभारात बदल केले गेले आहेत. कार्यकारी अभियंते आबासाहेब ढवळे, राजेंद्र राणे, संजय भोसले, संजय घुबे, शशिकांत मोरे, संजय खाबडे, नितीन देशमुख, प्रवीण घोडे यांच्या बदल्या झाल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख