आमदाराच्या मुलीच्या मांडव डहाळीला नाचणं अधिकाऱ्याच्या अंगलट...आयुक्तांकडून दणका

भाजप आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष महेश लांडगे यांची कन्या साक्षी हिच्या मांडव डहाळे सोहळा चर्चेत आला होता.
pcmc commissioner rajesh patil gives punishment of junior engineer
pcmc commissioner rajesh patil gives punishment of junior engineer

पिंपरी : भोसरीचे भाजप (BJP) आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांची कन्या साक्षी हिच्या मांडव डहाळे सोहळ्यात दोन महिन्यांपूर्वी केलेले नृत्य महापालिकेचे कनिष्ठ अभियंते सुनील सिद्धाप्पा बेळगावकर (Sunil Belgaonkar) यांच्या अंगलट आले आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांना सक्त ताकिदीची शिक्षा मंगळवारी (ता.27) दिली. त्याची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात करण्यात आली आहे.

महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करणाऱ्या आयुक्तांनी अशोभनीय व बेशिस्त वर्तन करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. स्थापत्य विभागात कार्यरत बेळगावकर यांनी याप्रकरणी कोरोना नियमांचा भंग केल्याबद्दल दंड भरला होता. तसेच आमदार लांडगे व इतरांविरुद्ध याबाबत गुन्हाही दाखल झाला असल्याने बेळगावकरांचे फक्त सक्त ताकीद देण्यावरच निभावले गेले. भविष्यात असे घडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेण्यासही बेळगावकरांना बजावण्यात आले आहे. अन्यथा यापेक्षा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावर्षी 30 मे रोजी भोसरीत ही घटना घडली होती. आमदार लांडगेंच्या कन्येच्या मांडव डहाळे कार्यक्रमात स्वत: त्यांनी व इतरांनी सामाजिक अंतर न राखता व तसेच मास्कही न लावता नृत्य केले होते. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने लांडगेंना टीकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी 6 जूनला पुण्यात तारांकित हॉटेलमध्ये होणारा कन्येचा विवाह अगोदरच 31 मे रोजी आळंदीत वैदिक पद्धतीने साधेपणाने केला होता. 

भंडाऱ्याची मुक्त उधळण झालेल्या या मांडव डहाळे कार्यक्रमात बेळगावकरही नाचले होते.त्यामुळे त्यांना हे 1 जूनला महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली. त्यावर त्यांनी 22 जूनला खुलासा देत मांडव डहाळे सोहळ्यात सहभागी झाल्याचे कबूल केले. तसेच त्यात मास्क न लावल्याने दंडही भरल्याचे सांगितले. तरीही त्यांचे हे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) कायदा 1979 मधील तरतुदींचा भंग करणारे असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी बेळगावकरांना सक्त ताकिदीची शिक्षा दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com