शेतकऱ्यांचा पुळका आलेल्या राष्ट्रवादीने पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द करावी  - Pawana underground pipeline : BJP's criticism of NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

शेतकऱ्यांचा पुळका आलेल्या राष्ट्रवादीने पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द करावी 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 9 ऑगस्ट 2020

पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर 9 ऑगस्ट 2011 रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला रविवारी (ता. 9 ऑगस्ट) 9 वर्षे पूर्ण झाली.

पवनानगर (जि. पुणे)  : पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर 9 ऑगस्ट 2011 रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला रविवारी (ता. 9 ऑगस्ट) 9 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने येळसे (ता. मावळ, जि. पुणे) स्मारकावर श्रदांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की, "पवना धरणाहून पिंपरी चिंचवड शहरासाठी होणारी बंदिस्त जलवाहिनी कायमची रद्द होईपर्यंत विरोधातील लढा सुरूच ठेवण्यात येणार आहे. राज्यात मागील पाच वर्षांत भाजप शिवसेनेची सत्ता होती. गोळीबारात जे शेतकरी मृत्युमुखी पडले होते, त्यांच्या वारसांना त्या वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी देण्यात आली आहे. तसेच, या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हेही मागे घेण्यात आले आहेत. येळसे येथे मृत शेतकऱ्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.' 

पवना ते पिंपरी चिंचवड होणारी बंदिस्त जलवाहिनी रद्द करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन ती कायमची रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे बाळा भेगडे यांनी या वेळी सांगितले. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेस जलवाहिनी नेण्यासाठी पहिल्यापासून आग्रही होती. आंदोलनातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे सांगणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आज शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. स्मारकावर येऊन श्रदांजली वाहण्याचे ढोंग केले, खरंच तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर जलवाहिनी रद्द करून दाखवा.' 

दरवर्षी येथे मोठी श्रद्धांजली सभा होत असते. पण कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता तसेच या ठिकाणी जमावबंदीचा आदेश असल्यामुळे काही मोजकेच नेते व कार्यकर्त्याच्या उपस्थितीत या वर्षी ही सभा झाली. सकाळी पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावरील स्मारकापर्यंत ज्योत आणण्यात आली. त्यानंतर 12 वाजून 40 मिनिटांनी शेतकऱ्यांना श्रदांजली वाहण्यात आली. 

या वेळी पवना जलवाहिनी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवक अध्यक्ष संदीप काकडे, भाजपचे कार्याध्यक्ष किरण राक्षे, जिल्ह परिषद सदस्य अलका धानिवले, आरपीआयचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, माजी उपसभापती जिजाबाई पोटफोडे, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, बाळासाहेब घोटकुले, नारायण बोडके, किसन खैरे, विश्वनाथ जाधव, अंकुश पडवळ, संदीप भुतडा आदी उपस्थित होते 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख