पार्थ यांचे मिशन पिंपरी-चिंचवड.... मंगळवेढा मतदारसंघाचा विचारही नाही...

मावळ लोकसभा मतदारसंघावरच लक्ष देण्याचे पार्थ यांचे नियोजन
पार्थ यांचे मिशन पिंपरी-चिंचवड.... मंगळवेढा मतदारसंघाचा विचारही नाही...
parth-ajit pawar

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त माध्यमांनी थांबवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

पार्थ हे मावळ लोकसभा मतदारसंघावरच आगामी काळात लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. त्याची तयारी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीत पार्थ हे गुंतलेले असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे मंगळवेढा मतदारसंघाचा विचारही त्यांच्या मनात नसल्याचे स्पष्ट करणयात आले. 

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून पार्थ पवार यांनी पोटनिवडणूक लढवावी, अशी मागणी कर्मवीर औदुंबरअण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी केली होती. त्यानंतर हा विषय सुरू झाला. "पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ हा शरद पवार यांना मानणारा परंपरागत मतदारसंघ आहे. माझे आजोबा कर्मवीर औदुंबरअण्णा पाटील यांचे व शरद पवार यांचे स्नेहाचे संबंध सर्वांना परिचित आहेत, असा दावा करत अमरजित पाटील यांनी धुरळा उडवला होता.

पवार साहेबांच्या एका शब्दावर 1990 मध्ये कर्मवीर अण्णांनी विधानसभेचा आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊन सुधाकर परिचारकांना निवडून आणले होते. या पार्श्वभूमीवर आम्ही पवार घराण्याप्रती आमची निष्ठा कायम ठेवून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची मागणी पवार साहेबांकडे करीत आहोत. तसे पत्र आम्ही साहेबांना दिलेले आहे, असे सांगत पाटील यांनी आपल्या मागणीवर स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना याबाबत प्रश्न विचारत माध्यमांमध्ये हा विषय चर्चिला जात होता.

या साऱ्या प्रकारावर खुद्द अजित पवार यांनी खुलासा केला आहे. त्यांनी स्वतंत्रपणे निवेदनच प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचार-विनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा  पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in