पिंपरी : विधानपरिषद निवडणुक आचारसंहितेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या मोटारी आज काढून घेण्यात आल्या. त्यामुळे त्यांना खासगी वाहनाने यावे लागले. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या राज्यातील पाच जागांच्या या निवडणुकीमुळे वर्षभरातच पालिका पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने दुसऱ्यांदा काढून घ्यावी लागली आहेत. दरम्यान, कोरोनामुळे अगोदरच थंडावलेली शहरातील विकासकामे आता या आचारसंहितेमुळे महिनाभर पूर्ण ठप्प होणार आहेत.
या निवडणुकीसाठी एक डिसेंबर रोजी मतदान आहे. मात्र,मतोजणी ३ डिसेंबरला असल्याने तोपर्यंत ही आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत शहरात कुठलाही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. नव्याने विकासकामांना मंजुरी देता येणार नाही. परिणामी महिनाभर विकासकामांना पूर्ण ब्रेक लागणार आहे.
यापूर्वी राज्य विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे शहरातील विकास महिनाभर गायब झाला होता. दरम्यान,या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे १८ पैकी १० पालिका पदाधिकाऱ्यांची वाहने प्रशासनाने जमा केली. इतर नऊ पदाधिकारी पालिकेची गााडी न वापरता स्वतचीच वापरत होते. तर, उपमहापौरांची येत्या शुक्रवारी निवडणूक असल्याने त्यांना वाहन देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे फक्त महापौर माई ढोरे आणि महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांच्यासह आठ प्रभाग समिती अध्यक्षांच्या मोटारी जमा करण्यात आल्या. परिणामी महापौरांनी आपल्या खासगी वाहनाने आज कार्यक्रमांना हजेरी लावली.
राज्यातील पाच विधानपरिषद जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर झाला. त्यातील पुणे पदवीधर मतदारसंघात पिंपरी-चिंचवडचा समावेश होतो. त्यामुळे शहरात या निवडणुकीची आचारसंहिता लगेच लागून झाली आहे. त्याचा फटका अगोदरच मंदावलेल्या विकासकामांना होणार आहे. कोरोनातून किंचीत सावरत पालिकेच्या स्थायी समितीची चावी असलेली स्थायी समिती नुकतीच उड्डाण करू लागली होती. तिला पुन्हा यानिमित्ताने करकचून ब्रेक लागला आहे. त्यामुळे उद्याच्या स्थायीच्या बैठकीत कुठल्याही नव्या विकासकामाला मंजुरी मिळणार नाही.

