जमावबंदीचा भंग करुन आंदोलन पडणार महागात; राष्ट्रवादीचे पदाधिकारी अडचणीत - ncp leaders protest in pcmc against delay in purchasing remdesivir | Politics Marathi News - Sarkarnama

जमावबंदीचा भंग करुन आंदोलन पडणार महागात; राष्ट्रवादीचे पदाधिकारी अडचणीत

उत्तम कुटे
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आता अडचणीत आले आहेत. 
 

पिंपरी : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आता अडचणीत आले आहेत. जमावबंदी आदेश असतानाही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कालच्या (ता.७) स्थायी समितीच्या बैठकीत केवळ टक्केवारीसाठी ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन खरेदीचा ठराव स्थगित करण्याचा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे  आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्वता:च्या अधिकारात ही इंजेक्शन खरेदी करावीत, अन्यथा पालिकेस टाळे ठोकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिला आहे.
यासाठी राष्ट्रवादीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही केले. 

रेमडेसिवीर खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीने रोखल्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीने महापालिकेच्या प्रवेशव्दारावर आंदोलन केले. वाकडकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहर राष्ट्रवादी प्रवक्ते फझल शेख, कुणाल थोपटे आदी त्यात सहभागी झाले होते .मात्र, सध्या शहरात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचा त्यामुळे भंग झाल्याने हे आंदोलन या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.कारण त्याबाबत पालिका प्रशासन  पोलिसांत तक्रार देणार असल्याचे समजते. 

यासंदर्भात वाकडकर म्हणाले, शहरात सध्या कोरोनाचा स्फोट झाल्याने रुग्णांना  ‘रेमडेसिवीर’ची गरज भासत आहे. मात्र, प्रशासन  स्थायी समितीचा ठराव मंजूर होण्याची वाट पहात आहे. कारण स्थायीच्या आधीच्या  बैठकीत टक्केवारीसाठी ‘रेमडेसिवीर’खरेदी ठराव मंजूर न करता ती तहकूब करण्यात आली. हा प्रकार म्हणजे मानवतेला कलंक आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख