..तर बाळा भेगडेंचा भर चौकात जाहीर सत्कार : भडकलेल्या सुनील शेळकेंचे आव्हान! - Maval MLA Sunil shelke refuses claim by Bala Bhegade | Politics Marathi News - Sarkarnama

..तर बाळा भेगडेंचा भर चौकात जाहीर सत्कार : भडकलेल्या सुनील शेळकेंचे आव्हान!

उत्तम कुटे
गुरुवार, 21 जानेवारी 2021

बाळा भेगडे यांच्या प्रतिक्रियेवर शेळके भडकले.. 

पिंपरी : तळेगाव दाभाडे (ता.मावळ, जि. पुणे) नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्याने राजकीय वर्तुळात त्यावर वेगवेगळे दावे केले जात आहेत.  हा पक्षाच्या मावळमधील उद्याच्या विजयाची नांदी आहे, या भाजपचे माजी मंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी केला. त्याला राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी उत्तर दिले असून त्यांना आता दिवसाही स्वप्ने पडायला लागली आहेत, या शब्दांत खिल्ली उडविली. विधानसभेला झालेल्या पराभवातून ते अद्याप सावरल्याचे दिसत नाही, हे त्यांच्या या वक्तव्यावरून दिसते आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गतवेळपेक्षा घवघवीत यश मिळवल्याचा दावा भेगडे यांनी केला होता. त्यानंतर आज झालेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचे सुशील सैंदाणे विजयी झाल्यानंतर ही मावळमधील उद्याच्या भाजपच्या विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया देत पुढील आमदार हा भाजपचाच असेल,असेही त्यांनी सूचित केले होते. तसेच मावळची जनता विद्ममान आमदारांना भविष्यात काय धक्के द्यायचे ते देईल,असे ते म्हणाले होते.

त्याचा शेळके यांनी समाचार घेताना तेच (भेगडे) अजून विधानसभेला बसलेल्या पराभवाच्या धक्यातून सावरलेले दिसत नाहीत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ५९ पैकी ३५ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपने केलेला दावाही त्यांनी पुन्हा खोडून काढला. राष्ट्रवादीपेक्षा जास्त ग्रामपंचायती भाजपने जिंकल्याचे आढळले, तर भेगडेंचा म्हणतील त्या चौकात जाहीर सत्कार करीन, असे आव्हानही शेळके यांनी दिले. ५७ पैकी बिनविरोध निवडणूक झालेल्या आठ ग्रामपंचायती वगळता निवडणूक झालेल्या ४९ मधील ३५ ग्रामपंचायतीत विजय मिळवल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच ४० ते ४५ सरपंच हे महाविकास आघाडीचेच असतील, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कामापेक्षा इतर बाबीतच जनसेवा समितीला रस असल्याने त्यांची साथ यावेळी सोडली आणि भाजपचे पार्सल त्यांना पाठवून दिले, अशी प्रतिक्रिया त्यांनी आजच्या उपनगराध्यक्ष निवड निकालावर दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख