महेश लांडगेंनी लक्ष्मण जगतापांवर कुरघोडी केली आणि भाजपमध्ये ठिणगी पडली..
Mahesh Landage-Laxman Jagtap

महेश लांडगेंनी लक्ष्मण जगतापांवर कुरघोडी केली आणि भाजपमध्ये ठिणगी पडली..

वाकड-ताथवडे प्रभागातील चार नवीन रस्त्यांपैकी दोन रस्त्यांच्या मंजुरीसाठी मतदान घेण्यात आले. रस्त्यांचा विषय मंजूर करावा, असा आग्रह शिवसेनेचे राहुल कलाटे यांचा होता.

पिंपरी : महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना सत्ताधारी भाजपमध्ये मात्र गटातटाचे राजकारण जोर धरत आहे. विशेष म्हणजे पक्षाचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यात वर्चस्वावरून शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे.

त्याची प्रचिती बुधवारच्या स्थायी समिती सभेतही आली. समितीच्या 16 पैकी शिवसेनेचा केवळ एक सदस्य आहे. त्यांच्या भूमिकेला जगताप समर्थक सदस्यांचा विरोध होता. मात्र, लांडगे समर्थकांनी शिवसेनेची बाजू घेतल्याने भाजपमध्ये फूट पडल्याचे उघड झाले.

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, पक्षाच्या शहर कार्यकारिणीत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि निष्ठावंत असे तीन गट कार्यरत असल्याचे चित्र आहे. शिवाय, जगताप व लांडगे यांचे समर्थक नगरसेवकांचे प्रमाण जवळपास समसमान आहे. सध्या स्थायीचे सभापती संतोष लोंढे असून, ते लांडगे समर्थक आहेत.

रस्त्यांच्या कामावरून फूट
वाकड-ताथवडे प्रभाग 25 मधील ताथवडेतील गाडा रस्ता, वाकडमधील काळा खडक ते उड्डाणपूल रस्ता, ताथवडे व वाकड गावांच्या हद्दीवरील रस्ता आणि ताथवडेतील इंदिरा कॉलेज शनी मंदिर ते मारुंजीगाव अशा चार रस्त्यांच्या विकासाचे प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी स्थायी समोर ठेवले होते. त्यावरून भाजपमध्ये मतभेद झाले. यातील दोन रस्त्यांचे विषय तहकूब ठेवले. दोन रस्त्यांच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. त्यात शिवसेना नगरसेवकाच्या बाजूने राष्ट्रवादीचे तीन व भाजपच्या तीन नगरसेवकांनी मतदान केले.

अशी पडली फूट
वाकड-ताथवडे प्रभागातील चार नवीन रस्त्यांपैकी दोन रस्त्यांच्या मंजुरीसाठी मतदान घेण्यात आले. रस्त्यांचा विषय मंजूर करावा, असा आग्रह शिवसेनेचे राहुल कलाटे यांचा होता. वास्तविक त्यांचे एकच मत होते. राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक त्यांना साथ देतील असा अंदाज होता. मात्र, अपक्ष सदस्यासह भाजपचे अकरा सदस्य असल्याने प्रस्ताव मतदानाद्वारे फेटाळला जाणार, असे चित्र होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत मतदान केले. तर, अनपेक्षितपणे भाजपच्या लांडगे गटातील चारही नगरसेवकांनी शिवसेनेला बळ दिल्याने पाचविरुद्ध आठ मतांनी विषय मंजूर झाला.

यापूर्वीही संदोपसुंदी
भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीने कलाटे यांना पुरस्कृत केले होते. तेव्हापासून दोघांमधील वाद अधिकच प्रकर्षाने जाणवू लागला. वेळोवेळी त्याची प्रचिती आली. देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाचा सेवा रस्त्याची निर्मिती, वाकड- ताथवडे परिसरातील नवीन रस्त्यांची निर्मिती, पिंपळे सौदागरसह भूसंपादनाचा मोबदला यावरून जगताप विरुद्ध कलाटे संदोपसुंदी बघायला मिळाली आहे.

स्थायीतील सदस्य
संतोष लोंढे (अध्यक्ष), राजेंद्र लांडगे, सुवर्णा बुर्डे, भीमाताई फुगे, शीतल शिंदे, आरती चौंधे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, शशिकांत कदम, झामाबाई बारणे (अपक्ष), मयूर कलाटे, पंकज भालेकर, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे, राहुल कलाटे

महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप : 77
राष्ट्रवादी : 36
शिवसेना : 9
मनसे : 1
अपक्ष : 5
(राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे)

स्थायी समितीतील बलाबल
भाजप : 10
राष्ट्रवादी : 4
शिवसेना : 1
अपक्ष : 1 (भाजप समर्थक)
--

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in