कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने आठवड्यातच केली सूट बंद
due to corona delta plus variant new restriction in pimpari chinchwad

कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने आठवड्यातच केली सूट बंद

कोरोनाच्या डेल्टा प्लस या घातक प्रकाराचे रुग्ण राज्यात वाढल्याने आठवड्यापूर्वी शिथिल केलेले कोरोना निर्बंध येत्या सोमवारपासून पुन्हा कडक केले जाणार आहेत.

पिंपरी : कोरोनाच्या (Covid-19) डेल्टा प्लस (Delta Plus)  या घातक प्रकाराचे रुग्ण राज्यात वाढल्याने आठवड्यापूर्वी  शिथिल केलेले कोरोना निर्बंध (Lockdown) येत्या सोमवारपासून (ता.२८) पुन्हा कडक केले जाणार आहेत. परिणामी पिंपरी-चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) उघडलेले मॉल पुन्हा बंद होणार असून दुकानांचे शटरही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सातऐवजी सायंकाळी चार वाजताच खाली करावे लागणार आहे. 


हॉटेल्स,रेस्टॉंरंट आणि बारला रात्री दहा वाजेपर्यंत दिलेली सवलतही सहा तासाने कमी करण्यात आली आहे. यामुळे दुकानदार व हॉटेल आणि बारमालकांचा आनंद अल्पकाळच टिकला आहे. शनिवार व रविवारचा लॉकडाऊन तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदीही कायम आहे.

कोरोनाची पाच गटातील वर्गवारी डेल्टा विषाणूमुळे राज्य सरकारला पुन्हा तीन वर्गात काल करावी लागली. तसेच, २१ जूनला शिथिल केलेले निर्बंध त्यांनी पुन्हा कडक केले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज सायंकाळी सुधारित आदेश काढला.त्याअन्वये गेल्या सोमवारी दिलेली सूट या सोमवारपासून मागे घेण्यात आली आहे. परिणामी दुकाने आता सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सात नव्हे,तर पूर्वीसारखी चार वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत. तर,रात्री दहा वाजेपर्यंत उघडी राहणारी हॉटेल्स व बार आता सायंकाळी चार वाजताच बंद करावे लागणार आहेत. 

कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा पाच टक्क्यांपेक्षा खाली आल्याने प्रथम पुणे आणि नंतर आठवडाभराने म्हणजे २१ जूनपासून पिंपरी पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. आता,ते दोन्ही पालिका क्षेत्रात पुन्हा कडक आणि एकसारखे केले गेले आहेत.त्यानुसार शहरातील सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील. सामाजिक, धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना पन्नासच्या उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच हे कार्यक्रम तीन तासात उरकण्यास सांगितले गेले आहे. 

अत्यावश्यक सेवेतील दुकाने व सेवा मात्र आठवडाभर पण सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहे. सिनेमागृहे व नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडित कार्यक्रम जास्तीत जास्त २०, तर लग्न ५० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी आहे. शाळा,महाविद्यालये १५ जुलैपर्यंत बंद राहतील. सलून,जीम, पार्लर ही चार वाजेपर्यंतच विना एसी सुरु ठेवता येणार आहेत.पूर्वी आठवडाभर उघडी ठेवण्यास परवानगी दिलेली दारुची दुकानेही येत्या सोमवारपासून शुक्रवारपर्यंत फक्त सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.तर, शनिवार व रविवारी दारू व हॉटेलातून पार्सल घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in