पिंपरी लॉकडाऊनच्या दिशेने; दिवसभरात १ हजार ३२६ नवे रुग्ण अन् सहा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. यामुळे प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
covid19 cases in pimpari chinchwad on rise last 24 hours
covid19 cases in pimpari chinchwad on rise last 24 hours

पिंपरी : गेल्या काही दिवसांत दररोज वाढणारी कोरोनाची मोठी रुग्णसंख्या पाहता पिंपरी-चिंचवडची वाटचाल वेगाने लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाल्याचे दिसून येत आहे . शंभराच्या आत आलेली दररोजची रुग्णसंख्या आज १ हजार ३२६ वर गेली असून सहा जणांचा मृत्यू  झाला आहे. त्यातील दोन महापालिका हद्दीबाहेरील आहेत.

कोरोना नियमांचे उल्लंघन केले, तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा तीनच दिवसांपूर्वी महापौर माई ढोरेंनी दिला होता. मात्र, त्यानंतरही परिस्थिती न सुधारता उलट ती आणखी बिघडत चालली आहे. महापालिका हद्दीतील ग्रामीण भाग व त्यालगतच्या भागात कोरोना वेगाने हातपाय पसरु लागला आहे. त्यामुळे बंद केलेली कोरोना सेंटर पुन्हा सुरु करण्याची मागणी पुढे आली आहे. उच्चभ्रू परिसरात कोरोनाने हातपाय जोरात पसरले आहेत. रुग्ण दाखल होण्याची दररोजची संख्या झपाट्याने वाढत चालली असताना डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या मात्र कमी होत चालली आहे. तसेच रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा घरीच उपचार घेण्याकडे (होम आयसोलेशन) रुग्णांचा कल वाढला आहे. 

आजअखेर शहरातील कोरोना रुग्णसंख्या एक लाख १९ हजार ५१८ झाली आहे. त्यातील एक लाख आठ हजार १४३ बरे झाले. तर, दोन हजार ६९५ जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय तथा अॅक्टिव्ह पेशंटचा आकडा नऊ हजार ४७८ वर गेला आहे. त्यातील एक हजार ८०७ रुग्णालयात दाखल असून, सात हजार ६७१ हे घरीच उपचार घेत आहेत. शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये १७९ मोठे तर ८३२ छोटे तथा मायक्रो कंटेटन्मेंट झोन आहेत.

राज्यातील परिस्थिती लॉकडाऊन करण्यासारखी : ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

कोरोनाशी मुकाबला करताना राज्यातील नागरीक पुरेशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नंदुरबार जिल्ह्यात बोलताना केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातल्या मोलगी आणि धडगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. या ठिकाणच्या लसीकरणालाचा आढावा त्यांनी घेतला. लसीकरण झालेल्या नागरिकांशी संवाद साधत लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही नागरिकांना दिली. आपण स्वतः लसीकरण केले असून आपणही करा. लस घेताना घाबरण्यासारखे काहीही नाही. आपण लढवय्ये बिरसा मुंडा यांचे पुत्र आहोत. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करताना घाबरायचे कारण नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान नागरिक काळजी घेत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची वेळ उदभवली आहे असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com