लाच प्रकरणातील स्थायी अध्यक्षांना 'बेल', तर महापालिका कर्मचाऱ्यांना 'जेल'

स्थायी समितीचे अध्यक्ष भाजपचे अॅड. नितीन लांडगे यांना विशेष न्यायालयाने सोमवारी तात्पुरता जामीन मंजूर केला.
court grants bail to pcmc standing committee chairman nitin landge
court grants bail to pcmc standing committee chairman nitin landge

पिंपरी : लाचखोरी प्रकरणी अटक करण्यात आलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) स्थायी समितीचे अध्यक्ष भाजपचे अॅड. नितीन लांडगे (Nitin Landge) यांच्या आजींचे निधन झाल्याने त्यांना विशेष न्यायालयाने सोमवारी (ता.२३) तात्पुरता जामीन (Bail) मंजूर  केला. मात्र, या गुन्ह्यातील इतर चार महापालिका कर्मचाऱ्यांची जामिनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यांच्या जामिनावर २५ ऑगस्टला निर्णय होणार आहे.

एका ठेकेदाराच्या मंजूर झालेल्या सहा निविदांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी या पाच आरोपींनी निविदा रकमेच्या दोन टक्के म्हणजे एक लाख १८ हजार रुपयांची लाच मागितली होती. ती घेताना त्यांना गेल्या बुधवारी (ता.१८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली होती. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने आज त्यांना पुन्हा पुणे येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी एसीबीने पुन्हा आरोपींची पोलिस कोठडी सहाय्यक सरकारी वकील रमेश घोरपडे यांच्यामार्फत मागितली. तर, तपास पूर्ण झाला असल्याचे आरोपींच्या वकिलांनी सांगत कोठडीला विरोध केला. तो मान्य करीत सर्व आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. 

त्यानंतर लगेचच अॅड. लांडगे यांच्या वतीने तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज देण्यात आला. त्यांच्या आईच्या आईचे म्हणजेच आजीचे निधन झाल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. मात्र. अशा प्रकरणात तात्पुरत्या जामिनाची तरतूद नसल्याकडे सरकारी वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. मात्र, मानवतेच्या दृष्टिकोनातून न्यायाधीशांनी तीन दिवसांचा हंगामी जामीन दिला. कायम जामीन मिळण्यास वेळ लागणार असेल, तर अंतरिम जामीन देता येतो, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला आरोपी अॅड. लांडगेंचे वकील अॅड. प्रताप परदेशी यांनी दिला. तसेच आरोपीच्या दाढेला संसर्ग झाल्याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. 

अॅड. लांडगेंचे पीए आणि स्थायी समिती कार्यालयातील मुख्य लिपिक ज्ञानेश्वर कांबळे, संगणक चालक राजेंद्र शिंदे, लिपिक विजय चावरिया आणि शिपाई अरविंद कांबळे यांची,मात्र येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यांच्या जामिनावर २५ ऑगस्टला सुनावणी होणार असून, त्याच दिवशी निर्णयही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चौघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी होताच लगेचच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु केली आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. मात्र, अॅड.लांडगेंवर अद्याप कारवाई झालेली नाही. या आरोपींना २६ ऑगस्टला पुन्हा न्यायालयात केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com