
Chinchwad By-Election : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघात अपेक्षेपेक्षा लवकर अचानक आज पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली.ती बिनविरोध होणार की नाही, हे येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
भाजपचा चिंचवडचा उमेदवार कोण हे आजच ठरण्याचा दाट कयास आहे.तर, ही पोटनिवडणूक लढायची की नाही याचा निर्णय़ राष्ट्रवादी कॉंग्रेस येत्या दोन-तीन दिवसांत घेणार असल्याचे या पक्षातून आज सांगण्यात आले. ही निवडणूक बिनवरोध होऊ द्यायची की लढवायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील,असे राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष अजित गव्हाणे यांनी `सरकारनामा`ला सांगितले.
मात्र,यापूर्वीचा भाजपचा अनुभव जमेस धरता चिंचवडची पोटनिवडणूक लढविण्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या नुकत्याच केलेल्या दौऱ्यात दिले होते,याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.
स्व.आ. लक्ष्मण जगतापांच्या (Laxman Jagtap) कुटुंबातील उमेदवार असेल,तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, यापूर्वी अशा निधन झालेल्या महाविकास आघाडीचे खासदार,आमदारांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिले. एवढेच नाही,तर काही ठिकाणी ते निवडूनही आणले,ही बाब लक्षात घेता चिंचवडलाही ते उमेदवार देतील,अशी चर्चा आहे.जगताप कुटुंबाबाहेरील भाजपचा उमेदवार असेल,तर चिंचवडची निवडणूक राष्ट्रवादी नक्की लढेल,असा अंदाज आहे.
त्यासाठी त्यांच्याकडे येथून यापूर्वी लढलेले नाना काटे, भाऊसाहेब भोईर,मोरेश्वर भोंडवे यांच्यासह प्रशांत शितोळे,मयूर कलाटे अशी उमेदवारांची फौजही आहे.फक्त प्रश्न आहे ही जागा लढायची की नाही.कारण गतवेळी २०१९ ला ही जागा राष्ट्रवादीकडे होती. त्यामुळे यावेळीही त्यांचाच क्लेम तेथे राहणार आहे.
केंद्रीय निवडणूक आय़ोगाने चिंचवड आणि पुण्यातील कसबापेठसह इतर चार अशा सहा विधानसभा,तर एका लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. त्यात लक्षव्दीप या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार मोहमंद फैजल यांना फौजदारी खटल्यात शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी नुकतीच रद्द करण्यात आली.त्यामुळे तेथे पोटनिवडणूक होत आहे. तर,ती होणाऱ्या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे निधन झाल्याने ती होऊ घातली आहे.
झारखंडमधील रामगडच्या आमदार ममतादेवी यांनाही फैजल यांच्याप्रमाणे अपात्र घोषित करण्यात आल्याने तिथे पोटनिवडणूक होणार आहे. तर, चिंचवड आणि कसबापेठसह लुमलाचे (अरुणाचलप्रदेश)जांबे ताशी,तमिळनाडूच्या इरोडचे थिरूमहान इव्हारा आणि पश्चिम बंगालच्या सागरदिघीचे सुब्रता सहा या आमदारांचे निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक लागलेली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.