भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश अन् महिनाभरातच फसवणुकीचा गुन्हा दाखल - cheating case registered against congress leader ganesh gaikwad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश अन् महिनाभरातच फसवणुकीचा गुन्हा दाखल

उत्तम कुटे
शुक्रवार, 18 जून 2021

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस गणेश नानासाहेब गायकवाड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरीः महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि उद्योगपती गणेश नानासाहेब गायकवाड (Gansh Gaikwad) (वय ३६, रा. एनएसजी हाऊस,आयआयटी रोड,औध,पुणे) यांच्याविरुद्ध नऊ कोटी रुपयांची जागा बळकावून फसवणूक केल्याबद्दल हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी गेल्या महिन्यातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भाजपमधून (BJP) काँग्रेसमध्ये (Congress)  प्रवेश केला होता.

गायकवाड हे आधी भाजपमध्ये होते. ते २०१९ च्या विधानसना निवडणुकीवेळी भाजपकडून इच्छूक होते. त्यांनी गेल्या महिन्यातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना लगेचच प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस हे पद देण्यात आले होते. मात्र, महिन्यातच त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे हे पद औटघटकेचे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याबाबत काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो, याकडे आता लक्ष लागले आहे.  

हेही वाचा : मुकुल रॉय यांची आमदारकी गेल्यास सुवेंदू अधिकारींच्या वडिलांची खासदारकी जाणार 

बांधकाम क्षेत्रातील एनएसजी ग्रूपचे व्य़वस्थापकीय संचालक असलेल्या गायकवाड यांनी सूस (ता.मुळशी,जि.पुणे) येथील आपला दीड एकरचा प्लॉट बळकावून त्यात अतिक्रमण केल्याची फिर्याद पुण्यातीलच दुसरे बांधकाम व्यावसायिक विजय वसंत कुलकर्णी (वय ५८, रा. कर्वेनगर,पुणे) यांनी दिली आहे. त्यांच्या ट्रिनीटी रिऍलिटी फर्मची सूस येथे ६० गुंठे जागा बेकायदेशीरपणे पत्र्याचे आणि तारेचे कुंपण करून बळकावल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्याच जागेत जाण्यापासून मज्जाव करण्यात आल्याचीही त्यांची तक्रार आहे. यासंदर्भात गायकवाड यांची बाजू ऐकण्यासाठी वारंवार संपर्क करूनही तो झाला नाही. तपासाधिकारी खाडे यांनीही गायकवाडांचा फोन बंदच असल्याचे सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख