कोरोना काळातही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गैरव्यवस्थापन; केंद्रीय पथकाने ओढले ताशेरे

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पिंपरी चिंचवडमधीलबेड मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय पथकाने व्यक्त केले आहे.
कोरोना काळातही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गैरव्यवस्थापन; केंद्रीय पथकाने ओढले ताशेरे
central team visits pimpari chinchwad amid growing covid cases

पिंपरी : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पिंपरी चिंचवडमधील बेड मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय पथकाचे प्रमुख व दिल्ली येथील सफदरजंग मेडिकल कॉलेजचे संचालक प्रा. डॉ. जुगल किशोर यांनी व्यक्त केले आहे. यातून शहरातील बेड व्यवस्थापन समाधानकारक नसल्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच, त्यात सुधारणा होण्याची गरजसुद्धा दिसून आली. 

पाच दिवसांपूर्वीच शहराचे कारभारी आणि पालिकेतील सत्ताधारी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासन हे कोरोना केअर सेंटर व्यवस्थापनात कमी पडत असल्याचा ठपका ठेवला होता. तसेच, त्यांनी कोरोनाचा उद्रेक झाल्याने युद्धपातळीवर खाटा वाढवा, असेही सुचवले होते. त्यासाठी खासगी रुग्णालयांचे आयसीयू ताब्यात घेण्याचा आदेश त्यांनी पालिका आयुक्तांना दिला होता. या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीही आयुक्तांकडे अशीच मागणी केली होती. त्यावर केंद्रीय पथकाने काल (ता.९) शिक्कामोर्तब केलं. 

कोरोनाचा शहरात उद्रेक झाल्याने कोरोना रुग्णालये व कोरोना केअर सेंटर फुल्ल झाली आहेत. त्यातही गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. व्हेंटिलेटरसाठी तर मोठी प्रतीक्षा आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडून लूट सुरु आहे. बेड मिळाला,तर रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने त्याचा काळाबाजार सुरू आहे. ही परिस्थिती पाहून केंद्रीय पथकाने महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. 

शहरातील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या द्वीसदस्यीय  पथकाने पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली. दिल्ली येथील लेडी हार्डिंगे मेडिकल कॉलेजचे प्रा.डॉ. घनश्याम पतके हे या पथकाचे दुसरे सदस्य  होते.  

अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटल, महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये तयार करण्यात आलेली वॉररूम तसेच पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील आरटीपीसीआर चाचणी केंद्राला पथकाने भेट देऊन पाहणी केली. आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत चर्चा करून पालिकेच्या कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांची तसेच  कोरोना रुग्णवाढीचा दर, पालिकेच्या वतीने करण्यात येणारे बेड मॅनेजमेंट, उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर आदीबाबत माहिती घेतली.  यानंतर प्रा. डॉ. जुगल किशोर आणि प्रा. डॉ. घनश्याम पतके यांनी विविध सूचना दिल्या.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in