एक सदस्यीय प्रभाग पद्धत अन् भाजप, राष्ट्रवादीला वाटतंय पिंपरीत विजय आपलाच!

एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झालीतरीपिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेत आपणच येऊ, असा दावा भाजप आणि राष्ट्रवादीने केला.
एक सदस्यीय प्रभाग पद्धत अन् भाजप, राष्ट्रवादीला वाटतंय पिंपरीत विजय आपलाच!
after single ward system bjp and ncp claims victory in future election

पिंपरी : सध्याच्या बहुसदस्यीयऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली, तरी काही फरक पडत नसल्याचे सांगत पिंपरी-चिंचवडमध्ये (PCMC) सत्तेत आपणच येऊ, असा दावा भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन्ही पक्षांनी आज (ता.२५) केला. आम्ही महापालिकेतील सत्ता राखू, असे भाजपने  म्हटले आहे, तर २०१७ मध्ये गेलेली सत्ता २०२२ ला पुन्हा मिळवू, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीने व्यक्त केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १८ महापालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश बुधवारी (ता.२५)काढला.त्यामुळे या निवडणुका बहूसदस्यीयऐवजी एकसदस्यीय पद्धतीने होण्याची शक्यता वाढली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे भोसरीचे आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी प्रभाग कितीचा आहे त्याने काहीही फरक पडणार नाही, असे सांगितले. जनमानसात भाजपची प्रतिमा तयार झाल्याने पुन्हा भाजपच सत्तेत येईल, मग प्रभाग एकचा वा कितीचाही असेना,असे ते म्हणाले. 

भाजपचे महापालिकेतील पक्षनेते नामदेव ढाके यांनीही त्याला दुजोरा दिला. गेल्या साडेचार वर्षात शहरात, प्रत्येक प्रभागात पुढील तीस वर्षाचे नियोजन करून एवढी कामे झाली आहेत,की दोन्ही आमदारांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपच सत्तेत येणार,यात तिळमात्र शंका नाही, असे ते म्हणाले. 

यापूर्वी एकचा प्रभाग असतानाही राष्ट्रवादीने सत्ता मिळवली असल्याने आताही पिंपरी महापालिकेत पुन्हा सत्तेत येऊ, असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे -पाटील यांनी केला आहे. एकचाच नाही, तर दोनचा व तीनचाही प्रभाग असताना पक्षाने सत्ता मिळवलेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे एकचा प्रभाग असला, तरी राष्ट्रवादी पुन्हा शंभर टक्के सत्ता मिळवेल, असा आत्मविश्वास त्यांनी वर्तवला आहे. त्याचवेळी दोनचा प्रभाग अधिक सोईस्कर ठरेल, असेही ते म्हणाले.त्यामुळे मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेऊन शिफारस केली, तर आयोग त्यानुसार निवडणूक घेऊ शकतो,अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.   

फडणवीस सरकारने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत (मुंबई महापालिका वगळता) राज्यातील महापालिकांत २०१७ मध्ये आणली. त्याचा फायदा भाजपला होऊन प्रथमच पिंपरी महापालिकेत भाजप बहुमताने सत्तेत आली. १२८ पैकी ७७ त्यांचे नगरसेवक निवडून आले आणि गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले. त्यामुळे बहुसदस्यीय पद्धतीचा फटका बसल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची भावना आहे. 

परिणामी आगामी पालिका निवडणूक ही द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याची त्यांची मागणी आहे. दरम्यान, राज्यात सत्तेत आलेल्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने ही निवडणूक एक सदस्य पद्धतीने घेण्याचा कायदा २०१९ला केला. मात्र, त्याविषयी एकमत नाही. राष्ट्रवादी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा व्दिसदस्यीय पद्धतीचा कायदा, जर त्यातून राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मंजूर झाला, तर निवडणूक आयोगाला त्यानुसार महापालिका निवडणूक घ्यावी लागणार आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in