तरुण शीख ठेकेदारानं धाडस दाखवलं अन् श्रीमंत महापालिकेतील भ्रष्टाचार झाला उघड

श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या श्रीमंत गैरव्यवहारावर लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्यास्थायी समितीवरील यशस्वी सापळ्यामुळे शिक्कामोर्तब झाले.
after compalint of young contractor corruption in pcpc in exposed
after compalint of young contractor corruption in pcpc in exposed

पिंपरी : आतापर्यंत फक्त चर्चाच आणि आरोप झालेल्या श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (Pimpari Chinchwad Municipal Corporation) कोट्यवधी रुपयांच्या श्रीमंत गैरव्यवहारावर बुधवारी (ता.१८) लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) स्थायी समितीवरील यशस्वी सापळ्यामुळे शिक्कामोर्तब झाले. एकूणच महापालिकेत २०१७ ला प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या गेल्या साडेचार वर्षाच्या राजवटीत पालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचे एसीबीच्या या काळात वाढलेल्या लाचखोरीच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या कालावधीत असे नऊ ट्रॅप झाले आहेत.

दरम्यान, ना खाऊंगा,ना खाने दूंगा असे म्हणणाऱ्या भाजपची कालच्या एसीबीच्या कारवाईमुळे पुरती नाचक्की झाली आहे. फक्त २४ वर्षीय शीख तरुण जाहिरातदाराच्या धाडसामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप दोन पावले यामुळे मागे गेला आहे. होर्डिंग्जचा व्यवसाय असलेल्या या तरुणाच्या या कामाच्या सहा निविदा तथा टेंडरची वर्क ऑर्डर काढण्य़ासाठी एक लाख १८ हजाराची रुपयांची लाच घेण्यात आली. म्हणजे एका टेंडरच्या वर्क ऑर्डर म्हणजे त्यावरील एक सही व शिक्यासाठी अतिरिक्त वीस हजार रुपये लाच म्हणून पिंपरी पालिकेत मोजावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

यापूर्वी महापालिका आयुक्तांच्या पीएला बारा लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल २०१७ महापालिकेत भाजपची सत्ता येताच प्रथम  पकडण्यात आले होते.त्यानंतर आता महापालिका पदाधिकाऱ्यांचा पीएला (स्थायी समिती अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक) अशाच गुन्ह्यात अटक झाली आहे. आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी, मुख्याध्यापक असे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी लाच घेताना गेल्या साडेचार वर्षात पकडले गेलेत.मात्र, महापालिका पदाधिकारी व त्यातही महापालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीचा सभापती तथा अध्यक्ष हा मोठा व तगडा मासा प्रथमच गळाला लागला आहे.

स्थायी समितीतील टक्केवारी हे उघड गुपित आहे. त्यामुळे भाजप सत्तेत आल्यावर ती थांबली,तर नव्हती. उलट हा टक्का आणखी वाढला होता. त्याची चर्चा सुरु होती. आरोपही झाले होते. फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी होते. त्यावर काल ते झाले. स्थायीचे अध्यक्षच नाही,तर त्यांचे पीए आणि मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, नुकतेच स्थायी समिती कार्यालयात बदलून आलेले लिपिक विजय शंभूलाल चावरिया, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे आणि शिपाई अरविंद भीमराव कांबळे असे पाचजण लाच घेताना प्रथमच पकडले गेले. 

यातील तक्रारदार ठेकेदाराच्या होर्डिंग्जची २८ टेंडर मंजूर झाली होती. पण, त्याची वर्कऑर्डर निघाली नव्हती. त्यासाठी ते स्थायीचे अध्यक्ष व त्यांच्या पीएला भेटले. त्यावेळी त्यांनी टेंडर रकमेच्या तीन टक्के म्हणजे दहा लाख रुपयांची मागणी केली. नंतर दोन टक्यांवर म्हणजे सहा लाख रुपयांवर तडजोड झाली होती.त्यातील सहा फाईलवर सही करण्यासाठी एक लाख १८ हजाराचा हफ्ता घेताना आरोपींना पकडण्यात आले. त्यानंतर पिंगळे यांच्या कार्यालयातील ड्रावरमधून लाखो रुपये एसीबीने जप्त केल्याचे समजले आहे. त्यामुळे त्यांच्या व अध्यक्षांच्याही घराची झडती घेण्यात आली. मात्र,त्याचा तपशील मिळू शकलेला नाही. दरम्यान,या सर्व आरोपींना आज शिवाजीनगर,पुणे येथील विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com