भाजपसह राष्ट्रवादी, सेनेचे धाबे दणाणले; सर्वच सदस्यांची एसीबी करणार चौकशी
acb will interrogate all members of pcmc standing comittee

भाजपसह राष्ट्रवादी, सेनेचे धाबे दणाणले; सर्वच सदस्यांची एसीबी करणार चौकशी

एसीबी चौकशी करणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष आघाडी अशा सर्वच पक्षांच्या स्थायीतील १५ सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.

पिंपरी : भाजपची (BJP) सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे (Nitin Landge) व इतर चार महापालिका कर्मचाऱ्यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आज (ता.२१) पुन्हा दोन दिवसांची वाढ केली. स्थायी समितीतील इतर सदस्यांची चौकशी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पुणे येथील विशेष न्यायालयाने आरोपींच्या कोठडी शनिवारी (ता.२१) दुसऱ्यांदा वाढवली. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष आघाडी अशा सर्वच पक्षांच्या स्थायीतील १५ सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मुळापासून हे प्रकरण खणून काढले वा त्याचा खोलवर जाऊन तपास केला,तर टक्केवारीत गुंतलेले सर्वच पक्षांचे स्थायीतील सदस्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसे पुरावेही (सदस्यांची नावे असलेली पैशाची पाकिटे) एसीबीच्या हाती लागल्याचे समजते. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादीचे सदस्यही अडचणीत येणार आहेत. या सर्व सदस्यांचे जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. राज्यातील सर्वच व त्यातही मोठ्या महापालिकांच्या स्थायी समितीतील टक्केवारी व लाचखोरीच्या ओपन सिक्रेटवर पिंपरीत प्रथमच एसीबीचा हा हातोडा पडला आणि त्यावर जाहीर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे श्रीमंत पिंपरी महापालिकेची राज्यभर बेअब्रू झाली. 

एका जाहिरात ठेकेदाराकडून सहा लाखाची लाच मागून त्यातील एक लाख १८ हजाराचा पहिला हफ्ता घेताना अॅड. लांडगे, त्यांचे पीए तथा स्थायी समिती कार्यालयातील मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे,लिपिक विजय चावरिया,संगणकचालक चालक राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना गेल्या बुधवारी (ता.१८) पालिकेतच रंगेहाथ पकडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्यांना आजपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 

सर्व आरोपींना सकाळी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. त्यासाठी स्थायीतील इतर सदस्यांच्या चौकशी करण्याचे कारण देण्यात आले. तसेच, आरोपी हे तपासात सहकार्य करीत नसल्याचेही एसीबीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. ते मान्य करीत तसेच हे प्रकरण गंभीर असल्याचे नोंदवित न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी पुन्हा वाढवली.

एसीबी चौकशी करणार असल्याने स्थायीच्या सदस्यांचे टेन्शनही आता वाढले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपी असलेल्या चार पालिका कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्तांनी निलंबित करीत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र,त्यातच आऱोपी असलेल्या स्थायी अध्यक्षांवर भाजपने अद्याप अशी कारवाई केलेली नाही.त्यामुळे त्याची चर्चा असून त्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in