Pimpri Chinchwad Will Not Get Ministerial Birth | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने पिंपरी-चिंचवडला मंत्रीपदाची पुन्हा हुलकावणी

उत्तम कुटे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

या टर्मला तरी पिंपरी चिंचवडला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी आशा होती. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोघांचेही मंत्री होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहीले आहे.

पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने पिंपरी-चिंचवडला मंत्रीपदाची पुन्हा हुलकावणी मिळाली. शहरातील दोन्ही भाजप आमदारांच्या मंत्रीपदाच्या आशेवर पाणी फिरले. शहराला मंत्रीपद न मिळाल्याने शहरवासियांचीही मोठी निराशा झाली आहे. फडणवीस यांनी २३ तारखेला मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर शहर भाजपने केलेला जल्लोष आजच्या त्यांच्या राजीनाम्याने क्षणभंगूर ठरला.

भाजपची सत्ता व त्यातही फडणवीस मुख्यमंत्री राहिले असते, तर त्यांच्या अतिशय निकट असलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना व त्यातून शहराला प्रथमच मंत्रीपद किमान राज्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता होती. त्यातून शहराचा मंत्रीपदाचा 'बॅकलॉग' भरून निघणार होता. गत टर्मलाच ते मिळणार होते. २९१७ ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता प्रथमच आणल्याने शहराला मंत्रीपद देण्याचे आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी दिले होते. 

मात्र, दोघांच्या भांडणाचा लाभ तिसऱ्याचाच झाला. राष्ट्रवादीतून आलेल्यांना मंत्रीपद देण्याऐवजी मंत्रीमंडळ विस्तारात ते जुने भाजपाई आणि मावळचे आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांना दिले गेले होते. मात्र,यावेळी त्यांचा पराभव झाला. तर, मंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेले लक्ष्मण जगताप यांनी शहरात चिंचवडमधून आमदारकीची हॅटट्रिक केली. भोसरीत  महेश लांडगे हे पाऊण लाखाच्या मताधिक्याने दणदणीत विजयी झाले. यामुळे या दोघांपैकी एकाला यावेळी मंत्रीपदाची संधी मिळेल,अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. त्यातही लांडगेंना ते नक्की मिळेल,असे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते.

फडणवीस यांच्याशी असलेली लांडगेंची जवळीक,त्यांचा कामाचा झपाट तसेच राज्यात भाजपचे सातव्या नंबरच्या लीडने विजयी झालेले ते आमदार असल्याने क्रीडा व युवक राज्यमंत्री होतील, असा राजकीय जाणकारांचाही अंदाज होता.  मात्र, एकामागोमाग एक राजकीय भूंकप राज्यात होत गेले. त्यामुळे चित्र क्षणागणिक बदलत गेले. त्यातील आजच्या ताज्या बदलाच्या घडामोड़ीचा फटका शहराला व शहरातील दोन्ही भाजप आमदारांनाही बसला. त्यांचे मंत्रीपदाचे स्वप्न पुन्हा भंगले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख