pimpri-chinchwad-new mayor-rahul-jadhav-deputy-mayor-sachin-chinchwade | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड महापौर, उपमहापौर निवडणूक : `राष्ट्रवादी'चे हात दाखवून अवलक्षण, तर भाजपची गटबाजी उघड

उत्तम कुटे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव, तर उपमहापौर सचिन चिंचवडे यांची अखेर आज निवड झाली. या निवडणुकीतून आज सत्ताधारी भाजपमधील गटबाजी प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे उघड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही हात दाखवून अवलक्षण करून घेतल्याची चर्चा या निवडणुकीनंतर रंगली.

पिंपरीः पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव, तर उपमहापौर सचिन चिंचवडे यांची अखेर आज निवड झाली. 

या निवडणुकीतून आज सत्ताधारी भाजपमधील गटबाजी प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे उघड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही हात दाखवून अवलक्षण करून घेतल्याची चर्चा या निवडणुकीनंतर रंगली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. त्यांचे 77 नगरसेवक आहेत. अपक्ष पाच नगरसेवकांचेही त्यांना समर्थन आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ 36 आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर हा भाजपचा होणार हे उघड होते. तरीही राष्ट्रवादीने या पदासाठी उमेदवार दिले. तसेच ते कायम ठेवल्याने ही निवडणुक झाली. त्यामुळे गतवेळेसारखी ही निवड बिनविरोध होणे टळले. ती बिनविरोध करण्यासाठी सभागृहनेते एकनाथ पवार आणि महापौरपदाचे उमेदवार राहूल जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे दत्ता साने यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांची विनंती मान्य झाली नाही. परिणामी आज निवडणुक झाली. त्यात राष्ट्रवादीला त्यांच्या सभागृहातील संख्येएवढीही मते मिळाली नाहीत. उलट, भाजपला तीन मते अधिक मिळाली. त्यातून राष्ट्रवादीने हात दाखवून अवलक्षण केल्याची चर्चा  रंगली. गतवेळेसारखा त्यांनी बाय बाय देण्याची गरज होती, असे काहींचे म्हणणे पडले.

पण, बाय न देता राष्ट्रवादीने निवडणूक घेतल्याने भाजपमधील गटबाजी पुन्हा स्पष्ट झाली. महापौरपदासाठी डावलले गेलेले त्यांचे ज्येष्ठ नगरसेवक शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे हे मतदानाला गैरहजर होते. त्यांच्या जोडीने आणखी एक नाराज नगरसेवक व दुसरे वैयक्तिक कारणामुळे असे तिघे अनुपस्थित राहिले. त्यातून शहर भाजपमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले. 

महापौर भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे गटाचा झाल्याने लांडगे स्वत: यावेळी हजर होते. मात्र, उपमहापौर आपल्या गटाचा होऊनही चिंचवडचे भाजप आमदार आज पालिकेत व या निवडणुकीकडे व नंतरच्या जल्लोषाकडे फिरकलेच नाहीत. 

दरम्यान, या निवडणुकीच्या मतदानासाठी सभागृहनेते एकनाथ पवार यांनी व्हिप बजावला होता. तरीही सत्ताधारी भाजपचे तीन नगरसेवक गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही कारवाई होणार का अशी कुजबुज लगेच सुरु झाली. मात्र, ते फक्त अनुपस्थित राहिले. त्यांनी हजर राहून विरोधी उमेदवाराला मत न दिल्याने त्यांच्याविरुद्ध कसलीही कारवाई होणार नाही, असे भाजपच्याच गोटातून सांगण्यात आले. त्यात दोन नगरसेवक हे भाऊ, तर एक दादांच्या मतदारसंघातील व त्यांचा समर्थक असल्याने सभागृहनेते त्यांच्याविरुद्ध कारवाई करतील, अशी सुतराम शक्यता नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख