pimpri-chinchwad-bjp-ss-alliance-situation | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला युती नकोशी; मात्र शिवसेनेला हवीहवीशी

उत्तम कुटे
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

युती होणार की नाही ही एकच चर्चा सध्या राज्यभर राजकीय वर्तुळात आहे. मात्र, युती नको, असा सूर पिंपरी चिंचवड भाजपमध्ये आहे. तर,ती व्हावी अशी शहर शिवसेनेची इच्छा आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला असता हे आढळून आले. मात्र,नावानिशी बोलण्यास ते कचरत आहेत.

पिंपरी: युती होणार की नाही ही एकच चर्चा सध्या राज्यभर राजकीय वर्तुळात आहे. मात्र, युती नको, असा सूर पिंपरी चिंचवड भाजपमध्ये आहे. तर,ती व्हावी अशी शहर शिवसेनेची इच्छा आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला असता हे आढळून आले. मात्र,नावानिशी बोलण्यास ते कचरत आहेत.

शहराचा बहुतांश भाग (शहरातील तीनपैकी पिंपरी आणि चिंचवड हे दोन विधानसभा मतदारसंघ) मावळ लोकसभा मतदारसंघात येतात. तर,शहराचा उर्वरित भाग म्हणजे पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ हा शिरूरमध्ये मोडतो. मावळ आणि शिरूर या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत.गतवेळी युती होती.त्यामुळे हे दोन्ही खासदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. दरम्यान, चार महिन्यांनी झालेल्या विधानसभेला युती तुटली. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहिले. भाजप हा युतीतील धाकटा भाऊ मोठा कधी झाला, ते शिवसेनेला कळले नाही.

विधानसभेला व नंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप हा राज्यात एक नंबरचा पक्ष झाला. तसाच तो शहराचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूरमध्येही शिवसेनेपेक्षा वरचढ झाला. त्यामुळेच ताकद वाढल्याने युती नको असे शहर भाजपला वाटते आहे. त्यात त्यांच्याकडे विजयी होईल,असा उमेदवार मावळमध्ये आहे. त्यातून एक जागा मिळेल आणि वाढेल,असा त्यांचा दावा आहे.त्यामुळे युती न व्हावी, या मताचे ते आहेत. आणि ती झाली, तरी  मावळवर क्लेम करावा,असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

दुसरीकडे, भाजपच्या तुलनेत पक्ष म्हणून शिवसेनेची ताकद या दोन्ही मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर कमी झालेली आहे. शिरूरमध्ये विद्यमान शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा वैयक्तिक करिश्मा अधिक आहे. त्यातूनच त्यांनी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आपला गड बनविला आहे. मावळमध्ये युतीमुळे शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार गतवेळी झाले, असे शहर भाजपचे म्हणणे आहे. दुसरीकडे युती होवो अथवा न होवो शिवसेनेचे विद्यमान खासदारच पुन्हा उमेदवार असल्याचे जवळपास नक्की झालेले आहे. 

भाजपचे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे बारणेंचे,तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे आढळरावांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत. त्यामुळे युती झाली, तरी त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेला मनापासून किती मदत करतील,याविषयी राजकीय जाणकार आणि शिवसेनतही साशंकता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख