महिन्याला चार कोटींचा हप्तावसुली आणि त्याचे वाटप असे : पोलिस कर्मचाऱ्याचे ते पत्र व्हायरल

पोलिस खात्याची लक्तरे टांगणारे हे पत्र
police1.jpg
police1.jpg

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या एका पोलिस काॅन्स्टेबलच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले आहे. यात अनेक खळबळजनक बाबींचा दावा करण्यात आला आहे. हे पत्र मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक वरिष्ठांना लिहिल्याचे दिसून येत आहे. मात्र ज्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव यावर आहे, त्याने आपण असे पत्रच लिहिलेले नसल्याचा खुलासा केला आहे.

यात पोलिस आयुक्तलायातील अधिकाऱ्यांना किती रक्कम पोहचायची, प्रत्यक्षात किती जमा व्हायचे, काही आमदार मंडळी नाठाळ पोलिसांना कसे संरक्षण द्यायचे, संबंधित अधिकारी हा नेते, खात्यातील वरिष्ठांपासून ते पत्रकारांपर्यंत सर्वांना कसा मॅनेज करायचा याचा तपशील यात दिला आहे. त्यावरून बरीच खळबळ उडाली आहे. 


हे पत्र सध्या जोरदार व्हायरल होत असून ते पत्र खरे की खोटे? हे स्पष्ट नसले तरी या 'लेटर बॉम्ब'मुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.  तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस दलाची लक्तरे वेशीवर टांगल्याचे दिसून येते. 

काय म्हटले आहे पत्रात खंडणी अधिका-यापासून मला संरक्षण मिळावे, कारण भोसरी पोलिस ठाण्यात माझी नेमणूक असताना त्यांनी मला बेकायदेशीरपणे दुस-या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या तळेगाव येथील शंभर एकरातील फार्म हाऊसवर राखणीसाठी ठेवले. या बदल्यात हे अधिकारी मला दरमहा दहा हजार व उच्चपदस्थ अधिकारी पंधरा हजार रुपये देत होते.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर ते उच्चपद्‌स्थ अधिकारी येथे प्रमुख म्हणून आले. तेव्हा त्यांनी त्या निरीक्षकांचीही बदली पिंपरी-चिंचवडला करून घेत त्यांच्याकडे खंडणी प्रतिबंधक विभागाची जबाबदारी दिली. वास्तविक त्यांची नेमणूक केवळ वसुलीसाठी करण्यात आली होती. दरम्यान, निरीक्षकांनी माझ्यासह आणखी एकाची त्यांच्या विभागात बदली करून घेतली. त्यानंतर त्यांनी वसुलीसाठी मला त्यांचा मोहरा बनविला. पदाचा गैरवापर करून अनेक दुष्कृत्ये केली. पोलिस खात्यात प्रथमच एका शाखेसाठी दोन कार्यालये उपलब्ध झाली. एक आयुक्तालयात ते दुसरे कासारवाडी येथे आहे. आयुक्तालयातील कार्यालय हे केवळ फार्स असून सर्व अवैध धंदेवाले, उद्योग व्यावसायिक, जमिनीचे मॅटरवाले अशा सर्व वसुलीचे काम कासारवाडीतील कार्यालयातून सुरू झाले.

निरिक्षकांच्या सांगण्यावरुन मी व माझा सहकारी महिन्याला चार कोटी रूपये जमा करून साहेबांकडे द्यायचो. मात्र, आमचे साहेब आयुक्तालयाच्या प्रमुखांना केवळ पन्नास लाख द्यायचे. याबाबत बाहेर न बोलण्याची ताकीद त्यांनी दिली होती. या वसुलीसाठी आमच्या साहेबांनी सुरूवातीला शहरातील बड्या दोन लोकप्रतिनिधींना मॅनेज केले. त्यांना महिन्याला पंधरा लाख सुरू केले. अशाप्रकारे निरीक्षकांनी आपले साम्राज्य निर्माण केले. 

आयुक्तालयातील इतर दिग्गज व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरश: ताटाखालचे मांजर केले. आयुक्तालयाचे प्रमुख केवळ नामधारी होते. परंतु, सर्व सूत्रे आमचे साहेबच हलवायचे. प्रमुखांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून गप्प करुन ठेवले होते. तसेच आयुक्तालयात भेटण्यासाठी त्यांच्याकडे कोण येतेय हे पाहण्यासाठी आमच्या साहेबांनी तीन जणांची नेमणूकही केली होती.

पिंपरीतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे आमच्या साहेबांचा सर्व पैसा असतो. या व्यावसायिकाच्या माध्यमातून त्यांनी सुमारे वीस कोटी रूपये व्हाईट केले आहेत. सध्या निरिक्षकांचे विश्रांतवाडीत हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. चाकणला फॅक्‍टरी आहे. "त्या' प्रमुखांना आयुक्तालयात असताना त्यांनी एका कामगार नेत्याच्या मदतीने चाकण परिसरातील कित्येक कंपन्यांमध्ये गुंड पाठवून त्रास दिला आणि पुढे प्रोटेक्‍शनचे नाटक करून त्यांच्याकडून खंडण्या उकळल्या. त्या कंपन्यांमध्ये स्वत:चे कॉन्ट्रॅक्‍ट घुसविले. यासाठी खास आयुक्तालयात इंडस्ट्रीयल सेल स्थापन करून त्याचे इनचार्ज पद स्वत:कडे ठेवले. सध्या अनेक कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्‍ट आहे. पण निरीक्षकांनी माझ्या व माझ्या एका सहकाऱ्याच्या पत्नीच्या नावे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या काळातच लेबर कॉन्ट्रॅक्‍टचे लायसन काढून ठेवले आहेत. आज कायदेशीरपणे सर्व बिझनेस आमच्या नावे चालतो पण खरे मालक-चालक हे निरिक्षकच आहेत. यामुळे पुढे आम्हीच अडकणार आहोत. संबंधित कामगार नेता व बांधकाम व्यावसायिक यांना अत्यंत गंभीर गुन्ह्यात संरक्षण दिले आहे. हे सत्य बाहेर पडले तर हे लोक मला या जगातूनच गायब करून टाकतील, एवढी यांची ताकद आहे.

दरम्यान, आयुक्तालयाच्या "त्या' प्रमुखाच्या विनंती केल्याने येथे आलेल्या दुसऱ्या प्रमुखानेही वसुलीचे काम आमच्याच वरिष्ठ निरिक्षकांकडे सोपविले. मात्र, त्यांनी ठाणे येथून दुसऱ्याही एका अधिकाऱ्याची नेमणूक केली. सर्व मोठे अवैधं धंदे ठाण्यातील व्यक्तीच हाताळतो. तर वरिष्ठ निरिक्षकांकडेही काही प्रमाणात वसुलीचे काम शिल्लक आहे. परंतु त्यांना शहरावर राज्य करायचे आहे. आम्ही निरीक्षकांना सांगितले की, जाऊ द्या साहेब करू द्या त्यांना, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. निरीक्षकांनी पिंपरीतील आणखी एका बड्या लोकप्रतिनिधीला मॅनेज केले असून त्याच्या माध्यमातून दुसऱ्या प्रमुख अधिकाऱ्याविरोधात तक्रारी सुरु केल्या. या दोघांच्या भांडणात माझ्यासह माझ्या सहकाऱ्याचा नाहक बळी जाण्याची शक्‍यता आहे. कारण आजही सर्व काळ्या कामांना आम्हीच सामोरे जात आहोत. त्यामुळे काही झाले तरी आमचे साहेब सहीसलामत बाहेर पडतील. पण आम्ही मात्र नाहक बळी ठरू. तरी वरिष्ठ निरीक्षकांच्या कचाट्यातून मला सोडवावे. माझी पुणे शहर येथे मूळ घटकात बदली करावी जेणेकरून या लोकांपासून मी सुरक्षितपणे दूर जाऊ शकेल. 

असा मजकूर मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविलेलल्या या पत्रात नमूद असून 1 सप्टेंबर 2020 अशी तारीख आहे. त्यामुळे ते पत्र खरे की खोटे आहे, हे स्पष्ट नसले तरी वरिष्ठ निरीक्षक तसेच आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर आलेले सुरूवातीचे दोन प्रमुख यांच्यावर या पत्रात पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. 

माझ्या नावाचा खोटा वापर

1 सप्टेंबर 2020 अशी तारीख असलेले पत्र व्हायरल झाल्यानंतर 29 सप्टेंबर 2020 अशी तारीख नमूद असलेले आणखी पत्र व्हायरल झाले आहे. अगोदरच्या तक्रार अर्जातील पोलिस कर्मचाऱ्याच्याच नावे हे पत्र असून माझ्या नावाचा खोटा वापर केल्याचे त्यामध्ये नमूद आहे. "असा कोणताही प्रकार घडला नसून त्या अर्जातील सर्व मजकूर खोटा आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार व पोलिस दलाची बदनामी व्हावी, या उद्देशाने माझी खोटी सही केलेल्या व्यक्ती व सोशल मिडियावर पत्र प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करावी", अशी मागणीही संबंधित कर्मचाऱ्याने केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com